पौष्टिक जेवणामुळे वाढेल पोलिसांचा उत्साह, ऊर्जा
राजेंद्र डहाळे यांचे प्रतिपादन; लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागतर्फे पोलिसांसाठी श्रमपरिहार
पुणे : गणेश विसर्जनावेळी सलग २५-३० तास अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना सकस आहार उपलब्ध करण्याचा लायन्स क्लबचा उपक्रम स्तुत्य आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उभारलेल्या श्रमपरिहार केंद्रामुळे आमच्या पोलीस बांधवाना घरच्यासारखे ताजे, स्वादिष्ट व पौष्टिक जेवण, स्वच्छ पाणी मिळणार आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचा, सुरक्षारक्षकांचा आणि पोलिस मित्रांचा बंदोबस्त करण्यातील उत्साह वाढेल, तसेच त्यांना ऊर्जा मिळेल. गणरायाच्या आशीर्वादाने विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडेल, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे उभारलेल्या श्रमपरिहार केंद्राचे उद्घाटन डहाळे यांच्या हस्ते झाले. गेल्या १७ वर्षांपासून हे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात येते. याप्रसंगी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे उपप्रांतपाल (प्रथम) परमानंद शर्मा, उपप्रांतपाल (द्वितीय) सुनील चेकर, माजी प्रांतपाल फतेचंद रांका, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचे अध्यक्ष अनिल सुगंधी, सचिव पूनम अष्टेकर, खजिनदार दर्शन तोडकर, उपक्रमाचे प्रमुख कल्पेश पटनी यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फत्तेचंद रांका म्हणाले, “विसर्जनाच्या दिवशी हा उपक्रम आम्ही गेल्या १७ वर्षापासून राबवत आहोत. जवळपास दोन ते अडीच हजार पोलिस कर्मचारी, होमगार्ड्स, पोलिस मित्र आणि रांगोळीच्या पायघडया घालणारे राष्ट्रीय कला अकादमीचे स्वयंसेवक यांना पॅकेट्समधून ताजे व पौष्टिक जेवण दिले जाते. शिवाय केंद्रावर ८०० ते १००० लोक जेवण करतात. घरगुती तीन पोळ्या, मटकीची भाजी, पुलाव, लोणचे व बर्फी आदी पदार्थ यात असतात. शुक्रवारी सकाळी ११ ते शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ही भोजनव्यवस्था करण्यात आली आहे.”