सामाजिक कार्याला ५० वर्षे झाल्याबद्दल व्हिजन सोशल फाउंडेशनतर्फे सन्मान
पुणे : उल्लेखनीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा गोविंद जोशी यांना व्हिजन सोशल फाउंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चित्रा वाघ व पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गोखलेनगर येथील मुनोत सभागृहात नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला.
विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या कार्यकत्यांचा ‘व्हिजन सन्मान-२०२१’ने यावेळी गौरव करण्यात आला. व्हिजन सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास डाबी व अन्य मान्यवर उपस्थित होते. सामाजिक व प्राथमिक शिक्षण क्षेत्रात अव्याहतपणे ५० वर्ष केलेल्या कार्याबद्दल सुरेखा जोशी यांना सन्मानित करण्यात आले.
जनवाडी, वडारवाडी आणि गोखलेनगर परिसरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मुलांसाठी शिक्षिका म्हणून जोशी यांनी काम सुरु केले. जवळपास २५ वर्षे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता त्यांनी ज्ञानदानाचे काम केले. पुस्तकी ज्ञानासोबतच येथील मुलांना त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या संस्कारातून घडलेले विद्यार्थी आज भारतासह अन्य देशात विविध पदांवर कार्यरत आहेत.
शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अशिक्षित महिलांसाठी प्रौढ वर्ग चालवले. त्यांच्या या कार्याबद्दल तत्कालीन मंत्री भाई वैद्य, प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले होते. वंचित घटकांतील लोकांच्या शिक्षणासाठी काम करता आले, याचे समाधान आहे. पुढेही हे काम चालूच राहील, असे सुरेखा जोशी यांनी सांगितले.