प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची पत्रकार परिषदेत माहिती; संशोधन व विकास केंद्र सुरु करणार
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यतेने व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संल्गनतेने विधी (लॉ) अभ्यासक्रम, तर महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परिषद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या (बाटू) संलग्नतेने औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) अभ्यासक्रम यंदापासून सुरु झाले आहेत. विधी महाविद्यालयात इनक्युबेशन, तर फार्मसी महाविद्यालयात संशोधन व विकास केंद्र (आर अँड डी) स्थापन करणार आहोत, अशी माहिती सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सु षमा चोरडिया, महासंचालक प्रा. डॉ. शैलेश कुलकर्णी, संचालक प्रशांत पितालिया उपस्थित होते. काळाची गरज ओळखून शिक्षण पूर्ण होताच स्वतःचा उद्योगधंदा किंवा प्रॅक्टिस सुरु करता येईल, अशा स्वरूपाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासून उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन यंदा रौप्य महोत्सव साजरा करत आहे. अशावेळी सूर्यदत्त लॉ कॉलेज (विधी) आणि सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च (फार्मसी) ही दोन महाविद्यालये सुरु होणे आनंदाची बाब आहे. विधी महाविद्यालयात बीए एलएलबी हा पाच वर्षांचा लॉ अभ्यासक्रम आणि फार्मसी महाविद्यालयात डिप्लोमा इन फार्मसी (डी. फार्म) दोन वर्षांचा, तर बॅचलर ऑफ फार्मसी (बी. फार्म) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु झाला आहे. रोजगारक्षम व इंडस्ट्री रेडी व्हावेत, यासाठी विद्यार्थ्यांना शिकतानाच वकिलांसोबत प्रत्यक्ष काम करण्याची, तसेच फार्मसीमध्ये संशोधन व प्रकल्प करण्याची आणि प्रत्यक्ष उद्योग क्षेत्राचा अनुभव घेण्याची संधी दिली जाणार आहे. हा असा आगळावेगळा उपक्रम आम्ही सुरु करत आहोत. नवीन शिक्षण धोरणाला अनुसरून प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण इथे दिले जाणार आहे.”
“उद्योगांना भेटी, चर्चासत्र, वादविवाद, विधी व फार्मा व्यवसाय क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळणार आहे. कायद्याचा अभ्यास करणे म्हणजे केवळ कायदे आणि प्रकरणे लक्षात ठेवणे नव्हे, तर ते गंभीर विचार, विश्लेषणात्मक कौशल्ये आणि जटिल समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे देखील आहे. कायद्याचे शिक्षण तुमच्यासाठी संधींचे जग उघडेल. सूर्यदत्त लॉ कॉलेजमध्ये क्रिमिनल, कॉर्पोरेट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, पर्यावरण, मानवाधिकार या आणि अशा महत्वपूर्ण विषयात पारंगत होण्याची संधी आहे. लिटिगेशन, वकिली, कॉर्पोरेट, शिक्षण, सार्वजनिक सेवा अशा विविध क्षेत्रात नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. कायद्याचे शिक्षण केवळ करिअरसाठीच नाही, तर समाजावर सकारात्मक परिणाम होण्यासाठी महत्वाचे आहे,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “विधी क्षेत्रातील विविध मान्यवर, तज्ज्ञ अभ्यागतांची मार्गदर्शन सत्रे, चांगला कायदे अभ्यासक घडण्यासाठी पाठ्यक्रमासह अभरूप न्यायालय स्पर्धा, इंटर्नशिप, संशोधन प्रकल्प, मोफत कायदेशीर मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवले जातात. सूर्यदत्तमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक व भावनिक दृष्ट्या सक्षम बनवण्यावर, तसेच चारित्र्यसंपन्न व समृद्ध जीवनासाठी मूल्ये, संस्कार रुजविण्यावर भर दिला जातो. वैश्विक बंधुत्वाची भावना, समाजाच्या व देशाच्या शाश्वत विकासासाठी, पर्यावरण व मानवतेच्या रक्षणासाठी योगदान देणारा युवक घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
सेलिब्रिटी, एनजीओ, सीएसआर, सायबर, फॅशन, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आदी विषयांसंबधित कायद्यांचे शिक्षण, नामवंत व तज्ञ वकिलांचे मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजिले जाणार आहेत. त्यामध्ये इतर विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येईल. फार्माच्या विद्यार्थ्यांना शार्क टॅंकप्रमाणे एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असून, फार्मा ग्रुप स्टार्टअप स्पर्धा भरवण्यात येणार आहे. ज्ञानाचे आदानप्रदान होण्यासाठी असे उपक्रम गरजेचे असून, पुण्यातील सर्व महाविद्यालयांना यामध्ये सहभागी करून घेणार आहोत, असेही सुषमा चोरडिया म्हणाल्या.