भारताच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्या ९२ वर्षांच्या असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
लता मंगेशकर या अतिशय लोकप्रिय गायिका आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीचा आवाज आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांची अनेक अजरामर गाणी भारतीयांच्या ओठांवर आजही गुणगुणताना आपण पाहतो. या लाडक्या आणि लोकप्रिय गायिकेला २००१ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला.
दादासाहेब फाळके पुरस्कार, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर असे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या आजारातून लतादीदी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                