सरकारने पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक व कालबद्ध स्वरूपात राबवण्याची मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांकडे मागणी
पुणे : “राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या रक्षणाचे काम करणाऱ्या पोलीस विभागाचे खासगीकरण गंभीर बाब आहे. कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती केल्याने लोकांचा पोलीस यंत्रणेवर विश्वास उडून जाईल. याशिवाय लाखो तरुण घाम गाळून पोलीस भरतीची तयारी करत आहे. त्यांचा विश्वासघात होणार आहे. त्यामुळे कंत्राटी भरती रद्द करून राज्य सरकारने अतिशय पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवावी, अन्यथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे राज्यव्यापी आंदोलन केले जाईल,” असा इशारा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी दिला.
यासंदर्भांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून पोलीस भरतीच्या बाबतीत सरकारने पोलीस होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना न्याय देण्याची मागणी केली आहे. एकीकडे पोलिस भरतीचा पेपर फुटतो आणि दुसरीकडे मुंबईत तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याची जाहिरात निघते. याचा अर्थ शिंदे-फडणवीस सरकार प्रामाणिकपणे मेहनत करून पोलिस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांचा विश्वासघात करत आहे, अशी टीकाही आबनावे यांनी केली.
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सुरक्षा कंत्राटदार पोलिसांकडे देणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी विचारला आहे. कंत्राटी भरती करण्यासाठी सरकारने दिलेले कारण तार्किक नसून, उत्सव काळात अतिरिक्त मनुष्यबळ लागेल हे सरकारला आता कळले का? अशी विचारणाही त्यांनी निवेदनातून केली आहे. पेपरफुटीची दखल घ्यायची नाही आणि शासकीय भरती टाळून आणि कंत्राटी पद्धत आणायची हे चुकीचे धोरण युवक काँग्रेस कदापिही खपवून घेणार नाही, असे त्यांनी नमूद केले.