पंधरा शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे परिसरातील मुलांना पुस्तकवाचनाचा अनमोल आनंद अनुभवायला मिळतो आहे. ही संकल्पना स्पष्ट करताना विवेक कुडू म्हणाले, “गावचा विकास करताना फक्त साचेबद्ध कामांपुरतं मर्यादित राहू नये. मुलांच्या जाणिवा विकसित करणारा नवा उपक्रम राबवावा. वाचनालयाच्या माध्यमातून नव्या पिढीसाठी मनोरंजन व माहितीचा शाश्वत ठेवा उपलब्ध करून द्यावा असा विचार मी मांडला. आम्हा पंधरा शिक्षकांच्या समूहाने ही कल्पना उचलून धरली. एका संस्थेने • यासाठी सतरा हजार रुपयांची पुस्तकं उपलब्ध करून दिली. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाकडून कपाट मिळालं. इयत्ता सहावीतील सुरवी संजय कडू ही बालिका या वाचनालयाचं काम बघणार आहे. घराच्या ओटीवर आठवड्यातून दोनदा पुस्तकं मांडली जातील. निवडलेलं पुस्तक नोंदणी करून घरी वाचायला नेता येईल, अशी व्यवस्था केली आहे. मुलांसाठी गोष्टींच्या पुस्तकांचा खजिना यात असेल, त्या बरोबरीने विज्ञानाची माहिती सोप्या भाषेत समजावणारी पुस्तकंही असतील, शरीराच्या अवयवांची ओळख यासारख्या सामान्य ज्ञानावर आधारित पुस्तकांचा समावेश करण्यात येणार आहे. मनोरंजन, माहिती व ज्ञानवर्धक पुस्तकांचा समतोल यात सांभाळला जाईल.”
प्रतिभा कणेकर या माझ्या शिक्षिका होत्या. त्यांच्यामुळे वाचनाचे संस्कार माझ्यावर झालेत. त्यांच्या नावानेच प्रतिभा बालग्रंथालय हे नाव दिलं आहे. नजीकच्या काळात मुलांना एकत्र जमवून कथाकथन व अभिवाचनाचे कार्यक्रमही करायचं मनात आहे. वर्षभरात कोण जास्त पुस्तकं वाचतं, ते रजिस्टरमधील नोंदींच्या आधारे पाहून बक्षीस द्यायचं ठरवलं आहे. वाचनस्पर्धेसारखे प्रयोग या चळवळीला गती देऊ शकतील, असं वाटतं. डॉ. किरण सावे, अतुल दांडेकर, पराग जोशी, भोगीलाल वीरा, हितेंद्र शाह यांच्या उपस्थितीत आमच्या शिक्षक समृहातील प्रकाश चुरी, निखिल चुरी, वैभव कुछ आरती कुछ, दिलीप किशी व किरण पाटील आदी सर्वांच्या सहभागाने या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.