सीए भरत फाटक यांचा सल्ला; ‘आयसीएआय’च्या दीक्षांत सोहळ्यात ११०० स्नातकांना पदवी प्रदान
पुणे: “शिक्षण ही अविरत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे सनदी लेखापाल ही पदवी हा एक टप्पा आहे, असे मानून ज्ञानाची खोली आणि अनुभवाचे संचित मिळवण्यासाठी आपल्या ज्ञानशाखेशी संबंधित विशेष प्राविण्य प्राप्त करत राहावे,” असा सल्ला ज्येष्ठ सनदी लेखापाल, वेल्थ मॅनेजर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक भरत फाटक यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने आयोजित दीक्षांत सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून फाटक बोलत होते. म्हात्रे पुलाजवळील सिद्दी बॅन्क्वेट येथे आयोजित सोहळ्यात भरत फाटक व आर्थिक सल्लागार सीए रचना रानडे यांच्या हस्ते ११०० स्नातकांना सीए (सनदी लेखापाल) पदवी प्रदान करण्यात आली. प्रसंगी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए उमेश शर्मा, विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, ‘आयसीएआय पुणे’च्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए हृषीकेश बडवे, कार्यकारिणी सदस्य सीए प्रणव आपटे, सीए प्रितेश मुनोत, सीए राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते.
सीए भरत फाटक यांनी स्नातकांना व्यावसायिक जीवनाचे कानमंत्र सांगितले. “सनदी लेखापाल हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम आहे. इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अवघड असतो, पण सीए अभ्यासक्रमातून बाहेर पडणे, अवघड असते. एका टप्प्यापर्यंतचा तुमचा प्रवास आणि विशिष्ट अभ्यासक्रमाचा पाठपुरावा आता पूर्ण झाला आहे. तुम्ही आता व्यावसायिक जीवनाचा प्रारंभ करणार आहात. मात्र, शिक्षण कधीच संपत नसते. शिवाय व्यावसायिक आयुष्यात तुम्ही प्रतिदिवशी काही ना काही शिकतच असता. त्यामुळे सतत शिकत राहिले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.
सीए रचना रानडे म्हणाल्या, “सीए झाल्यावरही कष्ट घेत राहिले पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, त्यामध्ये आपण समर्पित भावनेने काम केले पाहिजे. सतत नवी कौशल्ये आत्मसात करत राहावे. करिअरला नैतिकतेची जोड असल्यास आपण अधिक यशस्वी होतो. त्यामुळे कठोर परिश्रम, कौशल्य विकास, समर्पण आणि नैतिकता या गोष्टींना आपण आयुष्यभर प्राधान्य द्यायला हवे.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “तीस टक्के स्नातक विद्यार्थिनी आहेत, याचा आनंद आणि अभिमान वाटतो. तुम्ही सारे नव्या युगाचे प्रतिनिधी आहात. जागतिक पातळीवर ऑडिटच्या संधी तुमच्यासमोर आहेत. युरोप, कॅनडा, सिंगापूरसह सारे जग कामासाठी खुले आहे. भारतीय सनदी लेखापालांच्या दर्जाविषयी जगभरात अतिशय गौरवपूर्ण बोलले जाते. तो लौकिक कायम राखा.”
सीए उमेश शर्मा यांनी दर्जा, सातत्य आणि नैतिकता ही त्रिसूत्री जपण्याचे आवाहन केले. पदवी मिळणे, हा फक्त एक टप्पा आहे. खरी परीक्षा व्यावसायिक जीवनात समोर येणार आहे. त्यामुळे अभ्यासाची सवय कायम ठेवा. कामातील अचूकता जपा. कृत्रिम बुद्धीमत्तेसह अन्य तांत्रिक, यांत्रिक कौशल्ये काळानुसार आत्मसात करा”, असे शर्मा म्हणाले.
सीए ऋता चितळे यांनी मनोगत मांडले. सीए चंद्रशेखर चितळे यांनी सर्व स्नातकांना शपथ दिली. सीए अमृता कुलकर्णी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. सीए सारिका दिंडोकर व सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए सचिन मिनियार यांनी आभार मानले.