पुणे: मुलींच्या, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. शहरात गुन्हेगारी वाढलेली आहे. कोयता गँगची दहशत, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या यामुळे पुण्यात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शहराला भयमुक्त व सुरक्षित करण्यासाठी मनसैनिकांची फौज काम करते आहे. येत्या काळात महिला सुरक्षेसाठी २४ तास चालणारी हेल्पलाईन सुरु करणार आहे, असे कसबा विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अखेरचे दोन दिवस शिल्लक असून, मतदारांशी संवाद साधण्यावर सर्वच उमेदवारांनी भर दिला आहे. गणेश भोकरे गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या सुरक्षेचा लढा देत आहेत. त्यांची छेड काढणाऱ्यांना, अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करण्याचे काम ते करत आहेत. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदने दिली आहेत. युवकांचे प्रश्न मांडण्याचे काम त्यांनी केले. सोशल मीडियाच्या माध्यामातून, तसेच त्यांच्याबरोबर हजारो युवक जोडले गेले आहेत. युवकांचे प्रतिनिधित्व करणारे भोकरे यांची युवक, महिला वर्गासाठी काम करण्याची तळमळ युवकांना भावत आहे.
कसब्यात असंख्य माता-भगिनींचा कैवारी, युवकांचा नेता अशी ओळख झालेल्या भोकरे यांच्या पाठीशी असलेल्या युवावर्गाचा व महिलांचा टक्का लक्षणीय आहे. आपल्या इमानदार भावाला आमदार म्हणून निवडून देणार, असा विश्वास या बंधू-भगिनीकडून भोकरे यांना दिला जात आहेत. प्रचारादरम्यान त्यांचे औक्षण करून आशीर्वाद देत आहेत. शाळेत जाणाऱ्या, नोकरी व कामानिमित्त उशिरापर्यंत बाहेर जावे लागणाऱ्या, तसेच अन्य माताभगिनींच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन ही हेल्पलाईन सुरु केली जात आहे.
गणेश भोकरे म्हणाले, “महिलांशी गैरवर्तन करणाऱ्याना आजवर अनेकदा चोप दिला आहे. पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यापुढे महिलांना अधिक सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, संकटकाळात त्यांना त्वरित मदत मिळावी, यासाठी ही हेल्पलाईन २४ तास कार्यरत राहील. हजारो मनसैनिक यासोबत जोडले जातील. त्यामुळे शहराच्या सर्व भागात त्यांना त्वरित मदत मिळेल आणि त्यांच्यावर होणारा अत्याचार रोखून गुन्हेगारांना शिक्षाही देता येईल.”