नवकल्पनांना ‘आयपी यात्रे’मुळे मिळतेय व्यावसायिकतेचे व्यासपीठ

नवकल्पनांना ‘आयपी यात्रे’मुळे मिळतेय व्यावसायिकतेचे व्यासपीठ

अभय दफ्तरदार यांचे प्रतिपादन; ‘एआयसी पिनॅकल’तर्फे दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रेचे उद्घाटन

पुणे: “नवकल्पनांच्या पातळीवर असलेल्या उद्योजकीय शक्यतांना, व्यावहारिक पातळीवरील वास्तविक उद्योगक्षेत्राशी जोडता यावे, यासाठी अनुकूल अशा वातावरणाची आणि व्यासपीठाची निर्मिती करण्याच्या हेतूने राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रेचे आयोजन केले आहे. नवउद्योजकांना संजीवनी देणारा हा उपक्रम आहे,” असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाचे सहायक संचालक अभय दफ्तरदार यांनी केले.
 
केंद्रीय ‘एमएसएमई’ मंत्रालयाच्या सहयोगाने एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरमच्या वतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी दफ्तरदार बोलत होते. प्रसंगी भारत सरकारच्या पेटंट अँड डिझाईन विभागाचे सहनियंत्रक आशिष प्रभात, पिनॅकल इंडस्ट्रीज ग्रुपचे अध्यक्ष अरिहंत मेहता, नेदरलँड्स येथील टेक्निकल ट्रान्स्फर ऑफिसर डेनिस बेव्हर्स, दलित इंडियन चेंबर कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (डिक्की) राष्ट्रीय संयोजिका मैत्रेयी कांबळे, फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल आदी उपस्थित होते. आयपी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवरची माहिती देणे, टेक्नालाजी ट्रान्स्फर आणि आयपी व्यावसायिकरण, अशा तीन मुद्यांवर आधारित ही दोन दिवसीय आयपी यात्रा आहे.
अभय दफ्तरदार म्हणाले, “मंत्रालयाअंतर्गत स्टार्टअप्ससाठी समर्पित योजनांविषयी पहिल्या पिढीच्या उद्योजकांमध्ये जाणीवजागृती निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे. एखादी नवकल्पना उद्योजकीय शक्यतांनी परिपूर्ण असते, तेव्हा कल्पनेपासूनचा प्रवास प्रत्यक्ष उद्योगाच्या उभारणीपर्यंत पोहोचण्यासाठी युवा उद्योजकांना अनुकूल वातावरण, सल्लासेवा तसेच मार्गदर्शन पुरवले जाते. त्यासाठी इंटेलेक्चुअल प्राॅपर्टी फॅसिलिटेशन सेंटरच्या (आयपीएफसी) माध्यमातून काम केले जाते. स्टार्टअप्सना पेटंट, ट्रेडमार्क, काॅपीराईट, जिओ टॅग, इंडस्ट्रीयल डिझाईन अशा अनेक तांत्रिक घटकांची माहिती व मार्गदर्शन दिले जाते.”
 
आशिष प्रभात म्हणाले, “आधुनिक काळात स्टार्टअप ते उद्योग, हा प्रवास गुंतागुंतीचा आहे. त्यात अनेक प्रक्रिया आहेत. त्यामुळे नवकल्पनेचे रूपांतर व्यवसायात होण्यापर्यंतचा प्रवास सुरळीत होण्यासाठी पेटंट आणि डिझाईन प्रमाणित करणे गरजेचे आहे. विभागाच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षभरात १० लाख युवकांपर्यंत पोहोचलो आहोत. पेटंटप्रक्रिया ६ महिन्यांत पूर्ण केली जाते. सध्या सुमारे ७५ हजार पेटंट फायलिंग प्रक्रियेत आहेत. नजिकच्या काळात पेटंट आणि डिझाईन फायलिंगमध्ये २५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे, ही आकडेवारी दिलासादायक आहे”.

मैत्रेयी कांबळे म्हणाल्या, “दलित समाजघटकांमधील स्टार्टअपना मार्गदर्शन करण्यासाठी ‘डिक्की’ प्रयत्नशील आहे. याप्रकारच्या उपक्रमांमुळे आपल्या व्यवसायाच्या प्रमाणीकरणासाठी आणि हक्क सुरक्षित करण्यासाठी जागृती होते.”

डेनिस बेव्हर्स यांनी तंज्ञत्रान आदानप्रदानासाठी कार्यरत असल्याचा उल्लेख केला. अरिहंत मेहता यांनी नवकल्पनांना नवतंत्रज्ञान, नव्या बाजारपेठांशी जोडण्याचा एक प्रयत्न आयपी यात्रा उपक्रमातून होत असल्याचे सांगितले. 
 
सुनील धाडीवाल यांनी प्रास्ताविकात एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरमच्या कार्याचा आढावा घेतला. पूनम नहार यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *