‘आयसीएआय’ आयोजित ‘कौन बनेगा चतुर चाणक्य’च्या दुसऱ्या पर्वाचे विजेते ठरले इंदोरचे सीए अमर अहुजा
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने अंतरिक्ष टॉवर्स व जस्टकुक फूडवर्ल्ड यांच्या सहकार्याने आयोजित कौन बनेगा चतुर चाणक्यच्या (केबीसीसी) विजेतेपदाचा मान इंदोर येथील अमर अहुजा यांनी पटकावला. ‘केबीसीसी’चे हे दुसरे पर्व होते. औरंगाबाद येथील गिरीश लड्ढा उपविजेता ठरले. पुण्यातील निपुण सिक्री, निखिल ठक्कर व मुंबईतील झंकणा शहा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर राहिले. सन्मानपत्र, भेटवस्तू देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
पाच फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा झाली. पहिल्या फेरीत ३५०, दुसऱ्या फेरीत १००, तिसऱ्या फेरीत ५०, चौथ्या फेरीत २५, तर अंतिम फेरीत पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली. देशाच्या विविध भागातून स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. ‘केबीसीसी’चे सूत्रसंचालक (होस्ट) म्हणून ‘आयसीएआय पुणे’चे अध्यक्ष सीए समीर लड्ढा यांनी काम पाहिले. ‘कौन बनेगा करोडपती’च्या धर्तीवर गेल्या दोन वर्षांपासून सनदी लेखापाल व विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते.
‘आयसीएआय पुणे’चे उपाध्यक्ष सीए काशिनाथ पाठारे, सीए सचिन मिनियार, सीए स्नेहल रावले, सीए निलेश राठी, सीए संजय झंवर, सीए दिनेश मुंदडा, सीए प्रतीक बांगड, सीए अंकिता बांगड, सीए रवींद्र कामत, सीए निलेश देशमुख, सीए विशाल राठी, सीएमए पुष्कराज बेडेकर, सीए सीमा विठ्लानी, सीए करण चांदवानी यांनी स्पर्धेचे समन्वयन केले.
सीए समीर लड्डा म्हणाले, “विद्यार्थी व सनदी लेखापालांमधील बुद्धिमत्ता, कल्पकता, तर्कशक्ती व सृजनशीलता या गुणांना चालना मिळावी, यासाठी ‘केबीसीसी’ ही स्पर्धा आयोजिली जात आहे. दोन्ही वर्षी खूपच चांगला प्रतिसाद मिळाला असून, देशभरातून स्पर्धक यामध्ये सहभागी होत आहेत. प्राथमिक फेऱ्यांतून निवड झालेल्या पाच व्यक्तींना पुण्यात ‘हॉटसीट’वर बसण्याची संधी मिळते. ही स्पर्धा आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारी आहे.”