बंधुतेच्या विचारानेच समाजातील अराजकता नष्ट होईल; डॉ. अविनाश सांगोलेकर

बंधुतेच्या विचारानेच समाजातील अराजकता नष्ट होईल; डॉ. अविनाश सांगोलेकर

बंधुतेच्या विचारानेच समाजातील अराजकता नष्ट होईल
डॉ. अविनाश सांगोलेकर यांचे प्रतिपादन; पहिल्या विश्वबंधुता विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन
पुणे : “आपल्या मातीला साहित्य संमेलनाची परंपरा आहे. त्यातून सामाजिक अभिसरण होत असते. समाजात जाती-धर्माच्या नावाखाली सध्या अराजकता वाढत आहे. ही अराजकता नष्ट करायची असेल, तर बंधुतेचा विचार जनमानसात रुजायला हवा. बंधुता साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बंधुतेची पायाभरणी करण्याचे काम होतेय, सुखावह बाब आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी केले.
बंधुता लोकचळवळीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विश्वबंधुता साहित्य परिषद व भारतीय जैन संघटनेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या विश्वबंधुता विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या हस्ते झाले. प्रसंगी संमेलनाध्यक्षा डॉ. सविता पाटील, स्वागताध्यक्ष सुरेश साळुंके, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्राचार्य. डॉ. संजय गायकवाड, प्रा. चंद्रकांत वानखेडे आदी उपस्थित होते. प्रा. चंद्रकांत वानखेडे लिखित ‘बीजेएस’ गीताचे लोकार्पण, सरला कापसे लिखित ‘गगनभरारी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. ‘बंधुता गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
डॉ. अविनाश सांगोलेकर म्हणाले, “वंचित, दुर्लक्षित घटकांना आत्मसन्मान देणारे साहित्य निर्माण व्हावे. साहित्यामुळे क्रांतीची ज्योत पेटते. शिक्षण क्रांतीचे मूळ आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अस्थिर मानसिकता ओळखत पाठ्यपुस्तकापलीकडचे शिक्षण द्यावे. बुद्धीला, विचारांना चांगले वळण लावण्याचे काम शिक्षकांचे असते. स्त्रीशक्तीचा गौरव,सन्मान करण्याची मानसिकता आपण रुजवायला हवी.”
डॉ. सविता पाटील म्हणाल्या, “विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बंधुतेच्या कार्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम हे शिक्षकांचे आहे. समाजातील कोणताही बदल हा शिक्षकांच्या माध्यमातून यशस्वीपणे व प्रभावीपणे राबवता येतो. विश्वबंधुतेची शिकवण ही संतांच्या शिकवणीतून समाजाला प्रेरित करते. विश्वातील ज्ञान, बुद्धीवंतांनी लेखणीच्या व वाणीच्या माध्यमातून बंधुतेचा जागर केला आहे.”
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुतेच्या विचारांचे बीजारोपण जनमनात होण्याचा आग्रह संमलेनामागे आहे. बंधुभावाचा अभाव असतो, तिथे अस्थिरता दिसते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते दृढ होण्यास हे संमेलन महत्वाचे आहे.” 
 
प्रा. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन, सुरेश साळुंके यांनी स्वागतपर भाषण, तर डॉ. संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सहदेव चव्हाण यांनी आभार मानले.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *