‘विचारवंतांनी सत्तेच्या नव्हे, सत्याचा बाजूने बोलायला हवे’

‘विचारवंतांनी सत्तेच्या नव्हे, सत्याचा बाजूने बोलायला हवे’

‘मानवता, लोकशाहीच्या रक्षणासाठी विचारवंतांनी भूमिका घ्यावी’

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, लोकशाहीसाठी समंजस संवाद यांच्यातर्फे आयोजित ज्ञानवंतांच्या सत्कार सोहळ्यात सूर

डॉ. शरणकुमार लिंबाळे, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. विश्वास पाटील, डॉ. नागोराव कुंभार या चार ज्ञानवंतांचा सत्कार

 

पुणे: “स्वतःचे व स्वकीयांचे हित बाजूला ठेवून अखिल मानवजातीचा विचार करणारे लोक खरे विचारवंत असतात. नैतिक मूल्यांचे अधःपतन होत असताना, वैयक्तिक लालसेपोटी सामान्य माणसाच्या वेदनेचा विसर पडलेल्या या काळात मानवतेच्या व लोकशाहीच्या रक्षणासाठी विचारवंतांनी ठाम भूमिका घेत सत्तेच्या नव्हे, तर सत्य आणि मानवकल्याणाच्या बाजूने बोलायला हवे,” असे परखड मत ज्ञानवंतांनी मांडले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी आणि लोकशाहीसाठी समंजस संवाद यांच्यातर्फे ‘ज्ञानवंतांचा सत्कार’ सोहळा आयोजिला होता. सरस्वती सन्मानप्राप्त लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, गांधी अभ्यासक प्राचार्य डॉ. विश्वास पाटील आणि लेखक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांचा सत्कार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उल्हास पवार होते. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या सोहळ्यावेळी ज्येष्ठ पत्रकार संपादक अरुण खोरे उपस्थित होते.

डॉ. नागोराव कुंभार म्हणाले, “सध्याचे सामाजिक वातावरण अस्वस्थ करणारे आहे. नैतिक मूल्यांची, समर्पित भावनेची घसरण होत आहे. अशा स्थितीत व्यक्तीचे अस्तित्व अर्थपूर्ण व परिपूर्ण होण्यासाठी केवळ शारीरिक नव्हे, तर मानवी मनाच्या गरजा पूर्ण व्हायला हव्यात. आजच्या आव्हानांना गांभीर्याने घेऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर प्रबोधन व्हावे. दुर्दैवाने, गेल्या १० वर्षात साहित्यिक, विचारवंतांनी ठोस भूमिका घेतली नाही. सत्य आणि ज्ञान यावर प्रेम करणारा समाज घडला, न्यायाची संकल्पना योग्यरित्या राबवली, तर अनेक समस्या सुटण्यास मदत होईल.”

डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, “गांधी विरुद्ध आंबेडकर हा वाद अलीकडच्या काळात रंगवला गेला. प्रत्यक्षात गांधी आणि आंबेडकर यांच्यातील संबंध खूप चांगले होते. मंत्रिमंडळात आंबेडकरांचा समावेश असो की, राज्यघटनेच्या निर्मितीत महत्वाचे स्थान असो, गांधींनी कायम आंबेडकरांच्या प्रतिभेचा सन्मान केला. त्यामुळे आजच्य काळात गांधी अधिक आंबेडकर हा विचार घेऊन काम करण्याची गरज आहे. यामध्ये विचारवंतांनी या दोन महात्म्यांचे, त्यांच्या विचारांचे अभिसरण कसे होईल, यावर भर दिला पाहिजे. प्रस्थापितांनी उपेक्षित, दुर्लक्षित घटकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.”

डॉ. शरणकुमार लिंबाळे म्हणाले, “प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. स्वाभिमान, हक्क, अधिकार व माणूसपणाची जाणीव करून देणारा हा माझा आदर्श आहे. त्यांनी दिलेल्या आरक्षणामुळेच मला शिकता आले. इथपर्यंत पोहोचण्यात लोकशाही, प्रगतशील हिंदू समाज यांचे योगदान आहे. आजचा हिंदू सनातनी हिंदू नाही. त्याचे बेगडीपण आपण ओळखायला हवे. अन्यायाविरुद्ध बोलायला हवे. सामाजिक बांधिलकीतून आपली लेखणी चालवायला हवी. भेदभावाच्या भिंती भेदून सर्वांना समान न्यायाची भूमिका लेखकांनी घेतली पाहिजे.” 

डॉ. विश्वास पाटील म्हणाले, “महात्मा गांधी आणि पुणे शहराचे विशेष नाते आहे. बापू आणि बा अर्थात महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांच्यातील समर्पित नाते आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे. पैसा, ताकद आणि माध्यमे हाताशी असलेले सत्ताधारी बेचैन आहेत. निवडणूक, खुर्ची, स्वहित, सत्तेची लालसा याने त्यांना ग्रासलेले आहे. अशावेळी सत्याची, प्रेमाची आणि स्वाभिमानाची शक्ती जागृत ठेवण्याचे काम विचारवंतांना करावे लागेल. निर्भयता आणि विनम्रता या गोष्टी प्रत्येकाच्या मनात रुजवाव्या लागतील. वाकड्या वाटेने न जाता सरळमार्गी आयुष्य जगण्यावर भर द्यायला हवा.” 

अध्यक्षीय समारोपात उल्हास पवार म्हणाले की, अलीकडच्या काळात स्वयंघोषित विद्वान, कार्यसम्राटांचा सुळसुळाट वाढला आहे. मात्र, मानवतेचा, समाजाच्या कल्याणाचा विचार करणारी ही चार ज्ञानवंत मंडळी आहेत. प्रसिद्धीपराभिमुख राहून हे चौघेही आपले कार्य सातत्याने करत राहिले. विज्ञान युगात लोकशाही प्रगल्भ करण्याचे दायित्व आपल्यावर आहे. जाती-धर्मावर आधारित वाढत असलेले राजकारण चिंतेची बाब आहे. हे राजकारण विचार व विवेक शून्यतेकडे घेऊन जात आहे. महापुरुषांची हत्या करणाऱ्यांचे उदात्तीकरण गंभीर गोष्ट आहे. संकुचित विचारांवर प्रहार करण्याची भूमिका विचारवंतांनी घ्यावी.”

मराठीतील अग्रणी लेखक, कवी असलेल्या लिंबाळे यांनी सनातन, अक्करमाशी यासह कथा, कादंबरी, कविता आणि समीक्षा पुस्तके लिहिली आहेत. पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमातून आपल्या आयुष्याची सुरुवात केलेल्या लवटे यांना कोल्हापुरात सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची भूमी गवसली. लवटे यांनी मराठी, हिंदीतून विपुल ग्रंथ लेखन केले आहे. गांधीजींचे विचार आणि त्यांचे चरित्र अनेक हिंदी ग्रंथातून लिहून डॉ. पाटील यांनी फार मोठे योगदान दिले आहे. डॉ. कुंभार यांनी सलग ३८ वर्षे ‘विचारशलाका’, या त्रैमासिकाच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधनाचे कार्य केले आहे,” असे अरुण खोरे यांनी प्रास्ताविकात नमूद केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *