पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेला २०२१ मधील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय आणि विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. राष्ट्रीय स्तरावर ‘आयसीएआय पुणे शाखेला’ सर्वोत्तम शाखा व सर्वोत्तम विद्यार्थी (विकासा) शाखा म्हणून दुसरे पारितोषिक मिळाले. तर विभागीय पातळीवर आयसीएआय पुणे शाखेला द्वितीय आणि विद्यार्थी शाखेला प्रथम पारितोषिक मिळाले. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे, तर राज्य स्तरावरील पुरस्कार ‘आयसीएआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए निहार जांबूसरिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
दरवर्षी संस्थेच्या मुख्य व विभागीय कार्यालयातून सर्वोत्तम शाखेचे, तसेच विद्यार्थी शाखेचे पारितोषिक दिले जाते. राष्ट्रीय स्तरावरील १७ मेगा (सर्वाधिक सदस्य संख्या) शाखांमध्ये पुणे शाखेने पात्रतेच्या निकषांप्रमाणे काम करत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. तर विकासा या विद्यार्थी शाखेने द्वितीय क्रमांक पटकावला. विभागीय स्तरावर (पश्चिम विभाग) पुणे शाखेने द्वितीय आणि विद्यार्थी शाखेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. ही चारही पारितोषिके ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे शाखेचे अध्यक्ष सीए समीर लड्डा आणि उपाध्यक्ष सीए काशीनाथ पाठारे यांच्या नेतृत्वाखाली मिळाली आहेत.
सीए समीर लड्डा म्हणाले, “वर्षभरात ‘ई-स्क्वेअर’ संकल्पनेवर अर्थात एथिक्स, एक्सपान्शन, ई-गव्हर्नन्स आणि एक्सपरटाईज यावर भर दिला. अनेक नवीन वक्ते, आर्थिक विषयांसंदर्भात नवनवीन कार्यक्रम, राष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, सहकार राज्यमंत्री, सहकार आयुक्त, साखर आयुक्त प्राप्तिकर आयुक्त यांच्यासह इतर क्षेत्रातील मान्यवर व तज्ज्ञ व्यक्तींच्या संवादाचे कार्यक्रम झाले. सर्वच सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. त्याआधारे मूल्यांकन झाले. यामध्ये शाखेचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यालयाच्या कार्यकारणीचे सभासद, पश्चिम विभागीय कार्यकारणीचे सभासद ,शाखेच्या उपमंडळाचे सदस्य, पुण्यातील सर्व लेखापरीक्षक, व्याख्याते, विद्यार्थी, शाखेमधील सेवक इत्यादीचा महत्वाचा वाटा आहे. सर्वांच्या सहकार्याने व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने हे यश संपादन करणे शाखेला शक्य झाले आहे. ‘आयसीएआय’च्या देशभरात एकूण १६३ शाखा असून, पुणे शाखा राष्ट्रीय स्तरावरील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शाखा आहे. या शाखेत १०५०० सीए असून, २२ हजार सीए करणारे विद्यार्थी आहेत.”
सीए काशिनाथ पाठारे म्हणाले, “भविष्यातील ‘सीए’समोर असणारी स्थिती लक्षात घेऊन वर्षभरात कार्यक्रमांची आखणी केली. सीईओ-सीएफओ मीट, आउटरीच प्रोग्रॅम, सभासद वाढविण्यासाठी उपक्रम, रक्तदान शिबीर, स्वच्छ भारत अभियान, व्हर्टिकल गार्डन, वीर जवानांचा सन्मान, कोरोना काळात सामाजिक उपक्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अभ्यासक्रमासह अवांतर उपक्रम राबवले. उद्योगांना भेटी, आर्टिकलशिप कशी करावी, याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम, प्रोत्साहनपर व्याख्याने झाली. पुण्यातील सहा महाविद्यालयात अकौंटिंग म्युझियम उभारण्यात आले.”