‘आयसीएआय’चे (ICAI) राष्ट्रीय अध्यक्ष सीए (डॉ.) देबाशिष मित्रा यांची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे : सनदी लेखापालन व्यवसायाचे स्वातंत्र्य, अखंडता आणि उत्कृष्टता उंचावण्यासाठी राष्ट्रउभारणीतील एक महत्वाचा घटक आणि विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असलेल्या दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) ((ICAI) वतीने विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रव्यापी शाश्वत प्रशिक्षण कार्यक्रम, सोशल स्टॉक एक्सचेंज, डिजिटल इकॉनॉमी, ऑडिट स्टँडर्ड्स, फॉरेन्सिक अकाउंटिंग अँड इन्वेस्टीगेशन स्टँडर्ड्स आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती ‘आयसीएआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए (डॉ.) देबाशिष मित्रा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी उपाध्यक्ष सीए अनिकेत तलाठी यांच्यासह आयसीएआय पुणेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे, उपाध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, सचिव प्रितेश मुनोत, खजिनदार सीए प्रणव आपटे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.
सीए (डॉ.) देबाशिष मित्रा म्हणाले, “देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ‘आयसीएआय’ पुढाकार घेत आहे. डिजिटल लर्निंग हब, युडीन, डिजिटल कॉम्पेटन्सी मॅच्युरिटी मॉडेल, सेल्फ सर्व्हिस पोर्टल आणि वित्तीय साक्षरता ड्राइव्ह यासारखे अनेक उपक्रम राबवले आहेत. यासह ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा विस्तार, फायनान्स आणि ऑडिट फंक्शन्समध्ये त्याचा वापर, डिसेंट्रलाइज फायनान्स (डिफाय), बिग डेटा व आर्टीफिशिएशल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे. लोकप्रिय होत असलेल्या क्रिप्टोकरन्सी किंवा व्हर्च्युअल करन्सी याबाबत सखोल अभ्यास केला जाईल. त्यासाठी एका संशोधन गटाची स्थापना केली आहे. सीए सभासदांच्या सेवांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी नियमित काम सुरु आहे.”
“भारतात प्रथमच ‘आयसीएआय’च्या वतीने वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटंट्स (डब्ल्यूसीओए) (WCOA) १८ ते २१ नोव्हेंबर २०२२ दरम्यान मुंबईत आयोजित केली आहे. प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल स्वरूपात ही काँग्रेस पहिल्यांदाच होत आहे. ‘बिल्डिंग ट्रस्ट एनेबलिंग सस्टेनेबिलिटी’ या संकल्पनेवर ही काँग्रेस होणार आहे. १३५ देशांतून ६००० पेक्षा अधिक डेलिगेट्स यामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये अकौंटन्सी प्रोफेशन व भवितव्य यावर विचारमंथन होणार आहे,” असेही सीए मित्रा यांनी नमूद केले.
सीए अनिकेत तलाठी म्हणाले, “बदलत्या काळानुसार आता १० वर्षांऐवजी ५ वर्षांनी सनदी लेखापाल अभ्यासक्रमात बदल होत आहेत. गतिमान वातावरणात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटच्या भूमिकेत लक्षणीय बदल होत आहेत. धोरणात्मक निर्णय घेणे आणि उद्योजकीय भूमिकांकडे लक्षणीय बदल झाले आहेत जे आर्थिक रेकॉर्डिंग आणि अहवालाच्या पलीकडे मूल्य जोडतात. सनदी लेखापाल यांच्या सक्षमतेची पातळी, त्यानुसार, त्यांना या भूमिका प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सक्षम करण्यासाठी लक्षणीय वाढ करणे आवश्यक आहे.”
देशभरातील तरुणांना सनदी लेखापाल होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, आयसीएआय ने जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि उत्तरेकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अंदमान आणि निकोबार बेटे या आठ राज्यांतील नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट कोर्सच्या सर्व स्तरांसाठी नोंदणी कोर्स फीमध्ये ३१ मार्च २०२५ पर्यंत ७५% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे, असे तलाठी यांनी नमूद केले.