‘आयसीएआय’ पुणे शाखेला राष्ट्रीय व विभागीय स्तरावरील चार पुरस्कार

‘आयसीएआय’ पुणे शाखेला राष्ट्रीय व विभागीय स्तरावरील चार पुरस्कार

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील दोन, तर विभागीय स्तरावरील दोन अशा चार पुरस्कारांवर ‘आयसीएआय पुणे’ने नाव कोरले आहे. २०२५-२६ या वर्षामधील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय व विभागीय स्तरावर सर्वोत्तम शाखा व सर्वोत्तम विद्यार्थी (वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन- विकासा) शाखेचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.
 
नुकत्याच झालेल्या वार्षिक समारंभात ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए चरणज्योत सिंग नंदा व उपाध्यक्ष सीए प्रसन्न कुमार डी. यांच्या उपस्थितीत या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण झाले. दरवर्षी संस्थेच्या राष्ट्रीय व पश्चिम विभागीय कार्यालयातून सर्वोत्तम शाखेचे, तसेच विद्यार्थी शाखेचे पुरस्कार दिले जातात. राष्ट्रीय स्तरावरील शाखांमध्ये पुणे शाखेने आणि ‘विकासा’ या विद्यार्थी शाखेने पात्रतेच्या निकषांप्रमाणे काम करत हे पुरस्कार प्राप्त केले.
 
‘आयसीएआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार व ‘विकासा पुणे’च्या अध्यक्षा सीए प्रज्ञा बंब यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए राजेश अग्रवाल, सीए रेखा धामणकर व सीए अभिषेक धामणे, पुणे शाखेचे उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, व्यवस्थापन  समिती सदस्य सीए ऋषिकेश बडवे, सीए सारिका दिंडोकार, सीए नंदकुमार कदम, सीए प्रितेश मुनोत, ‘विकासा पुणे’चे उपाध्यक्ष श्रीयांश नवले, सचिव संयोगिता कुलकर्णी, खजिनदार वेदांत वेदुआ, सहसचिव प्रांजल देवकर, सहखजिनदार जय येडे व एडिटर हेड वैभव अंभोरे आदी उपस्थित होते.
 
सीए सचिन मिणियार म्हणाले, “वर्षभर आयसीएआय पुणे शाखेतर्फे ‘वन एट अ टाइम’ या संकल्पनेनुसार विविध कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे, राष्ट्रीय परिषदा, सामाजिक उपक्रम, सनदी लेखापालांसाठी कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये अनेकांचे सहकार्य, मार्गदर्शन व विश्वास लाभला. त्याबद्दल सर्वांचे आभार मानून हे पुरस्कार ‘आयसीएआय’ पुणे शाखामधील सर्व सदस्य, विद्यार्थी आणि कष्टकरी कर्मचाऱ्यांना समर्पित करतो. २०२५-२६ या वर्षात शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून हा पुरस्कार आपल्या सीए शाखेला मिळाला आहे.”