पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला ‘आयसीएआय’च्या ‘विकासा’ या विद्यार्थी शाखेचे व पब्लिक रिलेशन कमिटीचे यामध्ये सहकार्य लाभले. ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी यंदाची संकल्पना होती.
‘आयसीएआय’च्या पुणे शाखा अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी यांच्या नेतृत्वात झालेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सभासद सहभागी झाले. योगाचार्य प्रितेश केले यांनी योग या विषयावर मार्गदर्शन करत योग प्रात्यक्षिके घेतली. नीलिमा डुंगरवाल यांनी फिटनेस व प्राणायाम यावर मार्गदर्शन केले.
सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या, “शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग अतिशय गरजेचा आहे. सीए इन्स्टिट्यूटच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही योगदिनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनेक सभासदांनी याला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नियमित योग व प्राणायाम केल्याने आपल्याला दैनंदिन काम करतानाही ऊर्जा मिळत राहते.”