पुणे: दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) २०२६-२७ या वर्षासाठीच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच नवी दिल्ली येथे झाली असून, अध्यक्षपदी सीए प्रसन्न कुमार डी. तर उपाध्यक्षपदी सीए मंगेश पांडुरंग किनारे यांची निवड करण्यात आली आहे.
सीए प्रसन्न कुमार डी. हे ‘आयसीएआय’चे ७४ वे अध्यक्ष बनले असून, १९८४ पासून चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. चार दशकांहून अधिक अनुभव असलेल्या कुमार यांनी संस्थेच्या विविध समित्यांचे नेतृत्व केले आहे. शासन व नियामक संस्थांशी संबंधित धोरणात्मक कामात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. उपाध्यक्ष म्हणून २०२५-२६ मध्ये त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट्स बेनेव्होलंट फंडसाठी उल्लेखनीय निधी उभारणी केली होती.
सीए मंगेश किनारे हे ‘आयसीएआय’च्या केंद्रीय परिषदेवर तिसऱ्या कार्यकाळासाठी कार्यरत असून लेखा, लेखापरीक्षण, कर आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स क्षेत्रात ३३ वर्षांहून अधिक अनुभव आहे. ते व्यावसायिक विकास समितीचे माजी अध्यक्ष असून जीएसटी व आचारसंहितेवरील तज्ज्ञ वक्ते म्हणून ओळखले जातात.
नव्या नेतृत्वाकडून व्यावसायिक दर्जा उंचावणे, सदस्य कल्याण व जागतिक स्तरावर संस्थेची उपस्थिती अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
