– अखिल सदाशिव-शनिवार-नारायण पेठ आंबेडकर जयंती महोत्सव समिती, वंदेमातरम् संघटना, सरहद यांचा संयुक्त उपक्रम
पुणे : ‘राष्ट्रपुरुष आपल्या हक्काचे, नाही कोणत्या जातीचे’ हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतीरुपी अभिवादन करण्यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून अखिल सदाशिव-शनिवार-नारायण पेठ आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. या वर्षी राष्ट्रीय एकात्मतेचा नारा अधिक बुलंद करत थेट कारगिलमधील हुंदरमन या भारत-पाक सीमेवरील गावात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय’ साकारण्याचा संकल्प केला आहे. वंदेमातरम् संघटना, सरहद संस्था यांचे या उपक्रमाला उत्स्फूर्त योगदान लाभले आहे.
कारगिल युद्धामुळे कारगिल हे नाव देशातल्या प्रत्येक नागरिकाला माहित झाले असले, तरी मुळात कारगिल शांततेचा संदेश देणारी बुद्धभूमी आहे. ही बाब बहुसंख्य नागरिकांना माहित नाही. अत्यंत दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि राजकीय अनास्था यामुळे देशाभिमानी आणि शांतताप्रिय नागरिकांची ही बुद्धभूमी विकासापासून वंचित राहिली आहे. म्हणूनच ‘सरहद’च्या वतीने आपण कारगिलमधील हुंदरमन हे गाव ‘राष्ट्रीय एकात्मतेचे गाव’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प केला आहे. हुंदरमनमधील कामाची सुरुवात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय’ उभारून होत आहे, अशी माहिती वंदेमातरम् संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, ॲडव्होकेट अनिश पाडेकर, अनघा फाटक जोशी, महेश बाटले, गणेश देशपांडे यांनी दिली.
सर्व नागरिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आयोजक मंडळ यांना आवाहन करण्यात येते की, या ग्रंथालयासाठी फक्त इंग्रजी भाषेतील पुस्तके दान करुन आपण भारतरत्नास अभिवादन करावे. ‘ही व्यक्ती, हा विचार नाही फक्त एका निळ्या रंगाचा, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, अभिमान तिरंग्याचा…’ हे लक्षात घेऊन प्रत्येकाने या ग्रंथालयाच्या उभारणीत योगदान द्यावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय (कारगिल) या ग्रंथालयासाठी इंग्रजी पुस्तके दान करण्यासाठी ९७६६७८१६५९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे, तसेच या उपक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी वैभव वाघ : ९८९०७९८९०३ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.