मानव सेवा हीच ईश्वर सेवा

मानव सेवा हीच ईश्वर सेवा

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे मत; ‘सूर्यदत्त मानवसेवा राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते आदेश खिंवसरा यांना ‘सूर्यदत्त मानवसेवा राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या(Suryadatta Group of Institutes) वतीने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते. आदेश खिंवसरा ‘जितो’सह श्रमण आरोग्यम विंग, महावीर प्रतिष्ठान, आनंद प्रतिष्ठान, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स, पुना सकल जैन संघ, ऑल इंडिया जैन मायनॉरिटी सेल या संस्थांमध्ये ते संचालक, विश्वस्त, राष्ट्रीय सचिव आदी पदांवर कार्यरत आहेत.

गेल्या १५ वर्षांपासून आदेश खिंवसरा यांनी स्वतःला विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. जैनधर्मीय साधू-संतांना त्यांच्या प्रवासात सेवा देणे, त्यांच्यासाठी वैद्यकीय मदत पुरवणे, सर्वधर्मीय गरजुंना अंत्यविधीसाठी आवश्यक मदत करणे यासह हॉस्पिटलमधून पार्थिव नेणे, अंत्यविधीचे सामान आणणे, मृतदेहाला अंघोळ घालणे, नातेवाईकांना संबंधित ठिकाणी सोडविणे आदी कार्य खिंवसरा नि:शुल्क करतात. छिन्नविछिन्न झालेले मृतदेह आणणे आणि पोस्टमार्टमसाठी मदत करणे असेही प्रसंग त्यांनी अनुभवले आहेत.

कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अनेक लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, सहकाऱ्यांच्या मदतीने कोविड सेंटरची उभारणी करणे असे आश्वासक कार्य त्यांनी केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी तीन कोविड सेंटरची उभारणी केली. पहिल्या लाटेत ९८०, तर दुसऱ्या लाटेत ७५० जणांना उपचार देण्यात पुढाकार घेतला. रुग्णांसह कुटुंबियांना आर्थिक, मानसिक साहाय्य देण्याचे काम त्यांनी केले. लसीकरण मोहिमेच्या यशस्वी नियोजनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. कोविड कालावधीत चार महिने ते कुटुंबापासून दूर राहिले. दररोज जवळपास १८ ते २० तास त्यांनी काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध राष्ट्रीय संस्थांकडून त्यांना युवारत्न, विहार सेवा, सेवा शिरोमणी, साधु-साध्वी रत्न, युवा नेतृत्व, पुणे महानगरपालिका कोविड योद्धा, जितो महाराष्ट्र बेस्ट कोविड वॉरिअर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या संपूर्ण कार्याचा विचार करून त्यांना ‘सूर्यदत्त मानवसेवा राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात आल्याचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आदेश खिवंसरा म्हणाले, “सामाजिक कार्याची आवड आधीपासून होती. परंतु, त्याला दिशा देण्याचे काम विजयकांत कोठारी यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सेवाकार्य करत आहे. माणसाला माणूसपणाची आज गरज आहे. भौतिक गोष्टींपेक्षा ही मानवी स्पर्श आणि नात्यांच्या जपणूकीला अधिक महत्त्व आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नुकताच पुरस्कार मिळाला. आता राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना केलेल्या कामाची दखल घेतली जाते, अशी भावना आहे. अशा सन्मानामुळे आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. सामाजिक कार्याची जाणीव होत नाही, तोवर कार्य घडत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. युवकांनी स्वतःचे करिअर, व्यापारासोबत समाजसेवेचे व्रत हाती घ्यावे. स्वतःचा प्रांत, राज्य, देश या क्रमाने सेवा घडत राहिली पाहिजे. देशसेवा हे आपले कर्तव्य झाले पाहिजे. त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे.”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खिंवसरा यांचे कार्य समजून घेत त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सुषमा चोरडिया यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *