उद्योगनगरी शनिवारी अनुभवणार ‘हृदय संगीत’

उद्योगनगरी शनिवारी अनुभवणार ‘हृदय संगीत’

तब्बल वर्षभरानंतर उद्योगनगरीत शनिवारी (दि. १६) हृदय संगीताची अनुभूती मिळणार आहे. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या सांगीतिक कार्यक्रमात दस्तुरखुद्द भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे सूर गुंजणार आहेत. पंडितजींनी संगीतबद्ध केलेली, त्यांना आवडणारी आणि त्यांच्या हृदयाजवळची गाणी त्यांच्याच स्वरात ऐकण्याची संधी रसिक श्रोत्यांना मिळणार आहे.

पृथ्वी थिएटर्स आयोजित, मनिषा निश्चल्स महक निर्मित व प्रस्तुत ‘हृदय संगीत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन येत्या शनिवारी (दि. १६ जानेवारी) सायंकाळी ५.३० वाजता पिंपरी-चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह डॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्चल आणि वंडरबॉय पृथ्वीराज यांचे गायन ऐकण्याची पर्वणी आहे.

संगीत संयोजन विवेक परांजपे यांचे असणार आहे. वाद्यवृंदामध्ये पंडित रमाकांत परांजपे (व्हायोलिन), केदार परांजपे (सिंथेसायजर), डॉ. राजेंद्र दूरकर आणि विशाल गंड्रतवार (तबला व ढोलक), अजय अत्रे (ऑक्टोपॅड मशीन) डॉ. विशाल थेलकर (गिटार), शैलेश देशपांडे (बासरी) साथसंगत करणार आहेत. ‘मेहंदीच्या पानावर’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘भय इथले संपत नाही’, ‘ने मजसी ने’, ‘यारा सिली सिली’, ‘नैना बर से’, ‘लग जा गले’ अशा सदाबहार गीतांचा नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे.

लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकटामुळे गेल्या १०-११ महिन्यांपासून सांगीतिक कार्यक्रम बंद होते. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. गायक, संगीतकार व सांगीतिक कार्यक्रमातील अन्य कलाकारांना नवसंजीवनी देण्यासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर सरसावले आहेत. नाउमेद न होता पुन्हा त्याच उत्साहाने आपली कला सादर करण्याची प्रेरणा पंडितजी या कार्यक्रमातून सर्व कलाकारांना देणार आहेत, असे संयोजक मनीषा निश्चल यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *