प्रधान सचिव डी. सुरेश यांचे प्रतिपादन; पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचा बारावा पदवी प्रदान समारंभ
पुणे : “आपण करत असलेल्या कामातील प्रामाणिकता, सकारात्मक दृष्टीकोन आणि त्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे. पदवी मिळणे हा एक टप्पा असतो. करियरच्या वाटेवर चालताना अपयश आले, तरी खंबीरपणे सातत्याने प्रयत्नशील राहिल्यास यशप्राप्ती निश्चित होते,” असे प्रतिपादन हरियाणा सरकारचे प्रधान सचिव डी. सुरेश यांनी केले.
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम) संस्थेच्या बाराव्या पदवी प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश बोलत होते. एमबीए आणि पीजीडीएम अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या २०१९-२०२१ या तुकडीच्या ४५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्सेस, बिझनेस अनॅलिटीक्स आणि ऑपरेशन्स यांसारख्या शाखांमधील होते.
प्रसंगी ‘पीआयबीएम’चे संस्थापक अध्यक्ष रमण प्रीत, पूनावाला फिनकॉर्पचे अध्यक्ष मनीष चौधरी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक पारिजात पुष्प, त्राविस्काचे आकाश सुरेखा, आयएसडीसी’चे चेअरमन जे. पी. सिंग, विश्वस्त बी. जे. सिंग, ‘व्हीएमवेअर’चे विवेक जैन, शुगर कॉस्मेटिक्सच्या सीईओ विनिता सिंग आदी उपस्थित होते.
डी. सुरेश म्हणाले, “बदलत्या काळात व्यवस्थापन क्षेत्रातील संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच आर्थिक स्तरही उंचावला आहे. शेतीप्रधान भारत देशात शेती व्यवसायात मोठ्या संधी आहेत. तंत्रज्ञानाची जोड देत, शेतकऱ्यांच्या गरजा ओळखत या संधींचा लाभ घ्यायला हवा. पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्याची मोकळीक द्यावी. विद्यार्थ्यांनी नैतिकता, नितीमत्ता, नम्रता, सामाजिक बांधिलकी ही जीवनमूल्ये अंगिकारावी.”
रमण प्रीत म्हणाले, “ध्येयासक्ती आणि दूरदृष्टी असणे खूप महत्वाचे आहे. आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे, याची दिशा ठरवून त्याप्रमाणे काम करण्याची गरज आहे. ध्येयपूर्तीच्या वाटेवर अनेकदा अपयश येईल. मात्र, खचून न जाता, त्यातून मार्ग काढून ध्येय साध्य केले पाहिजे. दृढ इच्छाशक्ती, चांगला आहार व व्यायाम, संगत आणि मूल्यांची जपणूक जीवन घडवण्यात उपयुक्त ठरतात. नवनवी कौशल्ये, ज्ञान आत्मसात करत सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे.”
गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची परंपरा ‘पीआयबीएम’ने २००७ पासून जपली आहे. संस्थेचे विद्यार्थी आज सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. विविध उद्योग समूहांत उच्च पदावर कार्यरत आहेत, याचा आनंद वाटत असल्याचेही रमण प्रीत यांनी नमूद केले.
मनीष चौधरी, विनिता सिंग, विवेक जैन यांच्यासह इतर मान्यवरांनी ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. हर्षदा शर्मा यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.