जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वानवडी येथील दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्थेचा वार्षिकोत्सव
पुणे : ‘ए वतन, ए वतन’, ‘माउली माउली’, ‘आई गिरी नंदिनी’ या गाण्यावर कर्णबधिर मुलांचे नेत्रदीपक नृत्य… दिव्यांगांनी केलेली योगासनांची प्रात्यक्षिके… मनोहारी मानवी मनोरे… भवानीमातेचा केलेला जागर अन छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाला नृत्यातून दिलेली मानवंदना… या आणि अशा भारावून टाकणाऱ्या दिव्यांग मुलामुलींच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
निमित्त होते, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वानवडी येथील दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित वार्षिकोत्सवाचे! या कार्यक्रमासाठी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचे (ओएनजीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी किरण डी. एम. हे प्रमुख पाहुणे, तर पुण्यातील प्रसिद्ध आर्किटेक्ट अविनाश नवाथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाबळेश्वर येथील मॅप्रोचे व्यवस्थापकीय संचालक मयूर वोरा, संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे, उपकार्याध्यक्ष डॉ. स्मिता जोग, डॉ. सतीश जैन, मानद सचिव रवींद्र हिरवे, प्राचार्या शिवानी सुतार आदी उपस्थित होते.
वंदना पराडकर यांना गुणवंत सेवक पुरस्कार, महेक शेख व आदित्य भोसले यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिव्यांग कल्याणकारी सेवा पुरस्कार शि. प्र. मंडळीचे रुईया मूकबधिर विद्यालयाला (संस्था), तर संभाजीनगर येथील प्रणव राजळे (व्यक्ती) यांना, तर संस्थेतील गिरणी कामगार विठ्ठल सोनटक्के व धायरी येथील अनिता चाकणकर, श्रीगोंदा येथील संतोष बोळगे यांना विशेष पुरस्कार पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यश घाडगे, अनिरुद्ध पारडे व सागर ढगे यांना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले.
किरण डी. एम. म्हणाले, “जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर यशस्वी कामगिरी करता येते. शारीरिक अपंगत्वावर मात करून अनेक व्यक्तींनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या विद्यार्थ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी येथील सर्व गुरुजन मार्गदर्शन करताहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. ३० अभियंते, अनेक वैद्यकीय शाखेला प्रवेश घेतलेले विद्यार्थी येथे घडल्याचे ऐकून आनंद वाटला. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर द्यायला हवा. जी-२० सारख्या परिषदेत दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थांनी धोरणात्मक बाबी मांडायला हव्यात. ही एक जनचळवळ व्हावी.”
ॲड. मुरलीधर कचरे यांनी प्रास्ताविकात संस्थेत दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. अविनाश नवाथे, मयूर वोरा यांनी मनोगते व्यक्त करत दिव्यांग मुलांनी सादर केलेल्या कलेचे कौतुक केले. सुमित डोळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सतीश जैन यांनी आभार मानले.