पुणे, दि. ९ – “चित्रपटातील कलाकार, त्यांच्या नवनव्या कलाकृतींवर विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधण्याचे केंद्र अशी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सची ओळख निर्माण झाली आहे. चित्रपटांच्या निमित्ताने दिग्गज कलाकारांसह दिग्दर्शक, निर्माता संस्थेत येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. विद्यार्थ्यांसमोर आपले भावविश्व उलगडतात. त्यातून विद्यार्थ्यांना अनुभवाचे शिक्षण, या क्षेत्रातील विविध कौशल्ये विकसित होण्यास मदत होते. त्याचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते,” असे मत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले.
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्टस आणि सूर्यदत्त प्रॉडक्शन हाऊसच्या वतीने आयोजित ‘गुलकंद’ या आगामी चित्रपटातील कलाकारांचा ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थ्यांशी खास संवाद कार्यक्रमात प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया बोलत होते. संस्थेच्या उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा होते. प्रसिद्ध अभिनेते समीर चौघुले, अभिनेत्री ईशा डे, दिग्दर्शक प्रसाद ओक, कलाकार सचिन गोस्वामी, सचिन मोटे, शर्विल आगटे, दशरथ सिरसाठ आणि गणेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपले अनुभव, प्रेरणादायी गोष्टी आणि चित्रपट क्षेत्रातील प्रवास सांगितला.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संवादातून सर्वांगीण विकास’ या कल्पनेतून ‘नॉलेज इंनीशीएटिव्ह’अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लक्ष्मीकांत गुंड यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी ‘सूर्यदत्त’च्या वतीने प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांशी थेट संवाद साधला. ‘गुलकंद’ चित्रपटातील कथानक, निर्माण प्रक्रियेतील आव्हाने व त्यामागील प्रेरणा यावर दिलखुलास चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारत कलाकारांकडून मोलाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
हास्यजत्रेतून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या समीर चौघुले म्हणाले, “आपल्या जीवनात हास्याचे अधिक महत्व आहे. आजच्या गुंतागुंतीच्या आणि धावपळीच्या जगण्यात हसणे गरजेचे झाले आहे. एकूणच मनो-शारीरिक आरोग्याकरिता हसणे आवश्यक आहे. ‘गुलकंद’मधूनही प्रेक्षकांनी हसतहसत चित्रपट पाहावा हा प्रयत्न आहे.” विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे आणि मनाजोगे ध्येय गवसले की झोकून देऊन काम करावे. सातत्यपूर्ण परिश्रम, प्रयत्न आणि निष्ठा हे यशाचे गमक असल्याचे प्रसाद ओक यांनी सांगितले.
‘गुलकंद’ हा चित्रपट नव्या धाटणीची कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येत असून, मनोरंजनासोबतच एक सामाजिक संदेशही देत असल्याचे सचिन मोटे यांनी नमूद केले. शर्विल आगटे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. श्वेता राठोड कटारिया यांनी सूत्रसंचालन केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे व सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले.