सुषमा चोरडिया यांचे मत; बन्सी रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे वडील स्वर्गीय बन्सीलालजी चोरडिया यांची १८ वी पुण्यतिथी व वसंत पंचमीचे औचित्य साधून बन्सी रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रज्ञावंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी मुलांना संस्थेची चित्रफित दाखवली गेली. कार्यकारी संचालक प्रा. सुनिल धाडीवाल यांनी मुलांचे स्वागत केले. त्यांनी सूर्यदत्त शैक्षणिक समूहाबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी कोविड नियम पाळत उपस्थित होते.
स्वर्गीय बन्सीलाल चोरडिया यांना मुलांना धार्मिक शिक्षण देणे, मुलांवर संस्कार रुजविणे यामध्ये विशेष रुची होती. गरजू त प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता विविध उपक्रमाच्या माध्यमातून बक्षीस वाटप, तसेच स्पर्धा, पारितोषिके या माध्यमातून ते विद्यार्थ्यासाठी मदत उपलब्ध करून देत असत. तसेच त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने ते काम करत. हाच आदर्श समोर ठेवून ‘सूर्यदत्त’तर्फे दरवर्षी मुलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या अंतर्गत १०० पेक्षा अधिक मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते.
या प्रसंगी बोलताना सुषमा चोरडिया उपाध्यक्ष व सचिव सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट म्हणाल्या, “कोणत्याही चांगल्या परंपरेला जोपासणे आणि त्या परंपरेनुसार विद्यार्थ्यांना घडविणे महत्वाचे आहे. बन्सीलालजी चोरडिया यांच्या जीवनातून आम्ही शिकलो. आता पुढील पिढीला घडविणे सुरु आहे. वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची देवता सरस्वती जन्म झाला, असे मानले जाते. आजच्या दिवशी सरस्वतीची पूजा केली जाते. वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते. संस्कृती व आधुनिकता, संस्कार व विज्ञान याचा मेळ घालत आपल्याला शिक्षण पूर्ण करायचे आहे. दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करून, आवड निर्माण व्हावी आणि आवडीची सवय होवून योग्य ते यश प्राप्त करावे.”