…अन त्या दोघा भावांची शाळा पुन्हा सुरू झाली!
पुणे: हलाखीची आर्थिक परिस्थिती… शाळेची फी न भरल्याने मुलांची शाळा बंद… मुलांनी शिकावे ही आईची तळमळ… ती मायमाऊली मनसेच्या कार्यकर्त्याला भेटते, तिची व्यथा मांडते आणि तिच्या मुलांना शाळेत जाण्याची दारे पुन्हा खुली होतात. हा भावनिक प्रसंग अनुभवला, तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसबा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी.
निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, प्रचाराचा जोर वाढलेला असतानाही गणेश भोकरे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत मुलांची फी भरली आणि त्यांची शाळा पुन्हा सुरु झाली. आपल्या लेकरांची शाळा पुन्हा एकदा सुरु झाल्यानंतर त्या मायमाऊलीच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून भोकरे यांच्यासह कार्यकर्तेही भारावले.
कसबा पेठेतील पात्रे ताईंची व्यथा ऐकल्यानंतर प्रचार बाजूला ठेवत भोकरे यांनी संबंधित शाळेला भेट देऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली. आपल्या निवडणूक खर्चातून दोन्ही मुलांची शाळेची फी भरली. आता ही दोन्ही मुले पुन्हा शाळेत जाऊ लागली आहेत. लोकांना केवळ मदतीची आश्वासने देणारा नाही, तर प्रत्यक्ष कामातून त्यांच्यासोबत उभा राहणारा हा राज ठाकरेंचा शिलेदार असल्याचे भोकरे यांनी कृतीतून दाखवून दिले.
गणेश भोकरे म्हणाले, “फीअभावी शाळा बंद पडल्याचे समजल्यावर फार वाईट वाटले. त्यामुळे प्रचाराची वाट वळवत कार्यकर्त्यांसह शाळा गाठली. प्राचार्यांशी चर्चा करून मी दोन्ही मुलांच्या फीचा काही भाग भरला. मुलांची शाळा पुन्हा सुरु झाली. निवडणूक प्रचारातील काही खर्च टाळून ही शैक्षणिक मदत केल्याचे समाधान आहे.”
मुलांची आई म्हणाली, “गेल्या दीड-दोन वर्षांपासून आर्थिक स्थिती ठीक नसल्याने फी भरता आली नव्हती. अनेक मोठ्या लोकांना भेटले. पण मदत मिळाली नाही. गणेशभाऊ भोकरे यांना भेटले आणि अनेक महिन्यांपासून माझ्या मुलांची बंद असलेली शाळा पुन्हा सुरु झाली. लोकांच्या मदतीला धावणारा प्रामाणिक भाऊ भेटल्याचा आनंद वाटतो.”