भावी सनदी लेखापालांनी पारंपरिक ज्ञानाला प्रगत तंत्रज्ञानाची जोड द्यावी; सीए चंद्रशेखर चितळे

भावी सनदी लेखापालांनी पारंपरिक ज्ञानाला प्रगत तंत्रज्ञानाची जोड द्यावी; सीए चंद्रशेखर चितळे

भावी सनदी लेखापालांनी पारंपरिक ज्ञानाला प्रगत तंत्रज्ञानाची जोड द्यावी
सीए चंद्रशेखर चितळे यांचा सल्ला;
‘आयसीएआय’तर्फे ‘आरोहण २०२४’ दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन
 
पुणे: “भावी सनदी लेखापालांनी पारंपरिक ज्ञानासह आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा विवेकी दृष्टीकोनातून स्वीकार करावा. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर सनदी लेखापालांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने व्यावसायिक स्पर्धेची भीती बाळगू नये”, असा सल्ला ज्येष्ठ सनदी लेखापाल, केंद्रीय समिती सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी उभरत्या सीए विद्यार्थ्यांना दिला.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज, आयसीएआय पुणे व ‘विकासा’ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सीए विद्यार्थ्यांसाठी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात सीए चितळे बोलत होते. ‘आरोहण : असेंड, अचिव्ह, ऍडव्हान्स’ अशी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. परिषदेला १३०० पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार, परिषदेच्या समन्वयक व आयसीएआय पुणेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, उपाध्यक्ष सीए सचिन मिनियार, सचिव सीए हृषिकेश बडवे, खजिनदार सीए मोशमी शहा यांच्यासह कार्यकारिणी सदस्य सीए राजेश अग्रवाल, सीए अजिंक्य रणदिवे, सीए प्रीतेश मुनोत, ‘विकासा’चे अध्यक्ष सीए प्रणव आपटे, उपाध्यक्ष अभिराज शिंदे, सचिव वैभव अंबोरे, खजिनदार अमोल भोसले, सहसचिव कृष्णा घोळवे, सहखजिनदार गेया शहा, ओंकार फापळ आदी उपस्थित होते.

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सीए विद्यार्थ्यांची ही राष्ट्रीय परिषद ज्ञानोत्सव आहे. विद्यार्थ्यांनी आपली जिज्ञासा जागी ठेवत प्रश्न विचारावेत. प्रश्नांतूनच शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. काळ झपाट्याने बदलत असल्याने जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर सनदी लेखापाल या भूमिकेतून योगदान देण्यासाठी पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या. सातत्याने कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करा. मंदीची शक्यता, एआयचा वाढता वापर केल्याने मनुष्यबळाची गरज कमी होणे आणि वाढत्या स्पर्धेची अजिबात भीती किंवा शंका मनात बाळगू नका.”

“देशाची अर्थव्यवस्था यापुढे गतिमान राहणार आहे. सनदी लेखापालांच्या मागणीत वाढ होणार आहे. भारतीय सनदी लेखापालांनी प्रखर बुद्धीमत्ता, परिश्रमांची तयारी, दर्जेदार काम यामुळे जागतिक स्तरावर उत्तम प्रतिमा निर्णाण केली आहे. जगभरातील सुमारे १०० हून अधिक देशांत आज भारतीय सनदी लेखापाल कार्यरत आहेत. रोजगार शोधण्याऐवजी रोजगार निर्मिती करणारी उद्योजकीय मानसिकताही घडवा,” असेही त्यांनी नमूद केले.

सीए यशवंत कासार यांनी संस्थेचे बोधचिन्ह असणाऱ्या गरुडाच्या प्रतिमेविषयी भाष्य केले. ‘सर्वोच्च स्थानी जाण्याचे स्वप्न, महत्वाकांक्षा, उच्चमत ध्येय, आव्हानांचा सामना करण्याची मानसिकता, कम्फर्ट झोन सोडण्याची तयारी आणि उत्तम संगत, हे गुण गरुडाप्रमाणे सनदी लेखापालांनी अंगी बाणवावेत. व्यावसायिक शिस्त, स्वतःविषयी व पेशाविषयी विश्वासार्हता, समस्यांचे निराकरण करण्याची वृत्ती, वस्तुस्थितीचा अभ्यास, विश्लेषणाची आणि तर्कसंगत मांडणीची वृत्ती जोपासा’, असे कासार यांनी सांगितले.

सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या, ‘या परिषदेची आरोहण ही मध्यवर्ती संकल्पना अतिशय अर्थपूर्ण आहे. सीएच्या विद्यार्थ्यांनी सतत उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा, योग्य तेव्हा आपल्या क्षेत्रातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळवावे, कार्यरत असलेल्या मान्यवरांचा सल्ला घ्यावा म्हणजे विद्यार्थ्यांची सनदी लेखापाल म्हणून भावी वाटचाल अधिक औचित्याची होईल’.

सीए सचिन मिनियार यांनी आरोहण ही संकल्पना नेमकी असून, शिकण्याची प्रक्रिया निरंतर असते आणि तो एक शोध असतो, असे प्रतिपादन केले. परिषदेच्या अन्य सत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे शोधनिबंध, चर्चा, व्यावसायिक संधींविषयीची विशेष माहितीसत्रे तसेच काही प्रेरणादायी व्याख्यानांचेही आयोजन कऱण्यात आले होते.

सीए प्रणव आपटे यांनी स्वागत-प्रास्ताविकात दोन दिवसीय परिषदेची विस्तृत माहिती दिली. साक्षी आणि वल्लरी यांनी गणेशवंदना सादर केली. झाबिया सादिकोत आणि संजय लखानी, तसेच संयोगिता कुलकर्णी व श्रेयस दंडवते यांनी सूत्रसंचालन केले. अभिराज शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *