आ. शेखर निकम यांची विकासकामाला पुन्हा जोमाने सुरुवात
माखजन: संगमेश्वर तालुक्यातील माखजन एस. टी. बसस्थानकाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलणार आहे. बसस्थानक परिसरातील खराब झालेले आवर, खड्डे, आणि चिखलाच्या समस्यांमुळे प्रवासी, ग्रामस्थ, आणि एस. टी. कर्मचाऱ्यांना होणारा त्रास अखेर संपण्याच्या मार्गावर आहे.
माखजन ग्रामस्थांनी ही समस्या आमदार शेखर निकम यांच्यापर्यंत पोहोचवली, ज्यामुळे त्यांनी तत्काळीन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला. आमदार निकम यांच्या सखोल चर्चा आणि पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) फंडातून रु. १ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
आता या निधीच्या साहाय्याने बसस्थानकाचे सुशोभीकरण सुरू झाले असून, परिसरात दर्जेदार दुरुस्ती आणि आधुनिक सुविधांची उभारणी केली जात आहे. यामुळे स्थानकाचा कायापालट होणार आहे.
काम सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे तसेच तत्काळीन पालकमंत्री उदय सामंत यांचे मनापासून आभार मानले आहेत. ग्रामस्थांनी या निर्णयाचे कौतुक करत म्हटले,“आमच्या मागणीवर तत्काळ कार्यवाही होऊन निधी मंजूर होणे ही आमदार निकम व तत्काळीन पालकमंत्री उदय सामंत यांच्या कामाच्या शैलीची ताकद आहे.
“माखजन एस. टी. बसस्थानक हा परिसरातील प्रवाशांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. याचे काम वेळेत व चांगल्या प्रतीचे केले जाईल,” असे सांगत आमदार शेखर निकम यांनी समाधान व्यक्त केले.
माखजन स्थानकाच्या सुशोभीकरणाचा हा प्रकल्प फक्त विकासाची झलक नसून, जनतेच्या अडचणींवर नेहमी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने उत्तर देणाऱ्या नेतृत्वाचा आदर्श दाखवतो.