‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून डॉ. जितेंद्र जोशी यांचा सन्मान

‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून डॉ. जितेंद्र जोशी यांचा सन्मान

कोरोना काळात वैद्यकीय कर्मचारी, वंचित घटकांसाठी शेकडो उपक्रम
 
पुणे : पुण्यातील अभि ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र जोशी यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन संस्थेकडून सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटकाळात डॉ. जितेंद्र जोशी यांनी अभि ग्रुप व अभि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत हा सन्मान झाला आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे युरोप हेड विल्हेल्म जेझलर यांनी डॉ. जोशी यांना ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ प्रदान केले. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘सीएसआर शायनिंग स्टार अवार्ड’नेही सन्मानित करण्यात आले होते.
 
 
अभि ग्रुप व अभि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस बांधव, वंचित घटकांतील विविध वर्गांना साहाय्य करण्यात आले. कोरोनाच्या कठीण काळात देशभर वैद्यकीय उपकरणे, साहित्य पोहोचवले. पुण्यासह मुंबई, कोल्हापूर, लातूर, नाशिक, पंढरपूर, बेळगाव, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, अजमेर, बनारस, कोची, इंदोर, आसाम, अरुणाचल प्रदेश आदी शहरात १०० पेक्षा अधिक उपक्रम घेत पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क, गरजुंना अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक गोष्टींची मदत करण्यात आली.
 
पोलिसांना ८०० एन-९५ मास्क, फेसशील्ड, वाफेचे मशीन देण्यात आले. पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे, पंकज देशमुख, राज्य गुन्हे शाखेचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके, रंजन शर्मा यांच्या हस्ते पोलीस बांधवाना हे साहित्य वाटप झाले. अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते ३०० ब्राह्मण पंडितांना दोन महिन्याचे अन्नधान्य देण्यात आले. नाभिक बांधवाना अन्नधान्य किटसह नॅपकिन्स व अन्य साहित्य दिले. यासह अनाथालयांना, वृद्धाश्रमांना जीवनावश्यक साहित्य व सुरक्षेची साधने देण्यात आली. रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले. अभि ग्रुप व चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने समाजासाठी काम करता येत असून, आपल्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्याचा आनंद वाटतो, असे डॉ. जितेंद्र जोशी यांनी नमूद केले.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *