‘हंट्समन’कडून चाकण प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘मल्टिपर्पज हेल्थकेअर फॅसिलिटी सेंटर’ची उभारणी

‘हंट्समन’कडून चाकण प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘मल्टिपर्पज हेल्थकेअर फॅसिलिटी सेंटर’ची उभारणी

पुणे : उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत हंट्समन इंडिया कंपनीने चाकणजवळील कारंज विहिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) उभारलेल्या बहुपयोगी अत्याधुनिक वैद्यकीय केंद्राचे  (मल्टिपर्पज हेल्थकेअर फॅसिलिटी) लोकार्पण शुक्रवारी झाले. या केंद्रामुळे या भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. याचे रूपांतर लसीकरण केंद्र, बाह्यरुग्ण विभागात करत स्त्रिया व लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यावर भर दिला जाणार आहे.
 
या केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, हंट्समन इंटरनॅशनल (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या भारतीय उपखंड विभागाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल टिकू, साईट हेड आशिष बधे, सीएसआर प्रमुख रायोमंद सब्बावाला, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री महाजन, कारंज विहीरे गावाचे सरपंच यांच्यासह हंट्समन कंपनी व आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना राहुल टिकू म्हणाले,“या बहुपयोगी केंद्रासाठी कारंज विहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राशी सहयोग केल्याचा आम्हाला अभिमान आहे. हंट्समन अंतर्गत, तसेच भवतालच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याप्रती बांधील आहे. सध्याच्या सेवांशिवाय, भविष्यकाळात या सुविधा केंद्राचे अधिक सर्वांगीण वैद्यकीय केंद्रात सहज रूपांतर केले जाऊ शकते. आमच्या भागातील समुदायांच्या आरोग्य व कल्याणाला तसेच सहयोगींच्या सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य देतो. चाकण आणि आजुबाजूच्या खेड्यांमधील लोकांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल.”
 
डॉ. जयश्री महाजन म्हणाल्या, “या भागातील ३४ खेड्यांमधील एक लाखांहून अधिक लोकांना सेवा देण्याची क्षमता या केंद्रात आहे. गरोदर स्त्रियांना गर्भाची जन्मपूर्व चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि नियमित बाह्यरुग्ण विभागातील सेवा दिल्या जातील. ३,५०० चौरस फुटांच्या भव्य जागेत पसरलेले हे आस्थापन कोविड-१९ लसीकरण केंद्राला भेट देणाऱ्यांसाठी प्रतीक्षाकक्ष म्हणूनही उपयोगात आणले जाणार आहे.”
 
शरद बुट्टे पाटील यांनी हन्ट्समन इंडियाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या भागातील लोकांच्या कल्याणासाठी कंपनीने नेहमीच पुढाकार घेतला असून, अनेक समाजोपयोगी कार्य उभारले आहे. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत त्यांच्याकडून यापुढेही असेच चांगले कार्य होत राहील, असे बुट्टे पाटील यांनी सांगितले.
 
कोरोना काळात भरीव काम
कोविड काळात हंट्समनने अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचे २०,०००हून अधिक युनिट्स पुरवून २,००,०००हून अधिक लोकांना सहाय्य केले. पीपीई किट्स, एन-९५ रेस्पिरेटर्स, फेस मास्क, सर्जिकल ग्लव्ह्ज, सॅनिटायजर सोल्युशन्स आणि हॅण्ड्सफ्री डिस्पेन्सर्स मुंबई, पुणे, चाकण व बडोद्याजवळील खेड्यांमध्ये ही साधने पुरवण्यात आली. पद्रा, बडोदा येथील कोविड केअर सेंटरला ५० बेड्स व अन्य अत्यावश्यक वस्तू देण्यात आल्या. फिरत्या वैद्यकीय व्हॅन्सद्वारे नवी मुंबई व पुण्यातील २५,०००हून अधिक लोकांना आरोग्यसेवा पुरवल्या. विलगीकरण संरक्षण शीट्स पुरवून हजारो ऑटोरिक्षा चालक व प्रवाशांची सुरक्षितता प्रत्यक्षात आणली. मुंबई, पुणे व बडोद्यात कोविड-१९ लसीकरण, वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी तसेच प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरूकता केली. अन्नपदार्थांचा पुरवठा, रेशन किट, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. हंट्समनने बडोदा, चाकण, मुंबई व अल्लपी येथील गरजूंसाठी हजारो कोरड्या रेशनचे किट्स वितरित केले. याशिवाय हंट्समनने शेतकरी, मच्छिमार व ग्रामीण भागातील स्त्रियांना भाजी लागवड, मासेमारी व कुक्कुटपालन केंद्रे यांच्या माध्यमातून मदत केली. 
 
सेवाकार्याबद्दल पुरस्कार
या कार्याबद्दल कंपनीला नुकतेच इंटिग्रेटेड हेल्थ अँड वेल बीइंग कौन्सिल या नवी दिल्ली येथील थिंक टँकतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे हंट्समन इंडियाने गेल्या वर्षभरात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाला मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र, गुजरात व केरळमधील समुदायांना कोविड-१९ साथीशी लढण्यात सहाय्य करणाऱ्या कंपनीच्या विविध उपक्रमांमधील गुणवत्तेची या पुरस्कारामुळे दखल घेतली गेली आहे. याशिवाय कंपनीला फेडरेशन ऑफ गुजरात इंडस्ट्रीजने फेब्रुवारी २०२१ मध्ये सीएसआरमधील उत्कृष्टतेसाठी मान्यता दिली. गुजरातमधील खेड्यांमधील उपजीविकेच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी कंपनीने केलेल्या उपक्रमांचे फेडरेशनने कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *