बीजेएस, संचेती हॉस्पिटल व चांदमल मुनोत ट्रस्ट यांचा उपक्रम
पुणे : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल आणि चांदमल मुनोत ट्रस्ट यांच्या वतीने ‘३१ वे मोफत प्लॉस्टिक सर्जरी शिबीर’ दि. २ ते ४ जानेवारी २०२५ रोजी संचेती हॉस्पिटल, पुणे येथे आयोजित केले आहे, असे संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था व मुनोत ट्रस्टचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांनी सांगितले आहे.
विश्वविख्यात प्लॉस्टिक सर्जन पद्मश्री डॉ. शरदकुमार दिक्षित यांनी मागील तीन दशकांपेक्षा अधिक काळ भारतातील विविध शहरात अशा शिबिरांचे आयोजन केले आणि अमेरिकेत राहूनही त्यांनी भारतातील हजारो लोकांच्या चेहर्यावर प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून हास्य फुलवले आहे. मानवसेवेचा हा महायज्ञ त्यांचे अमेरिकेतील शिष्य प्रसिद्ध प्लॉस्टिक सर्जन डॉ. लॅरी वेइंस्टीन यांनी गेल्या १४ वर्षांपासून पुढे सुरू ठेवला आहे. येत्या जानेवारीत महिन्यात पुण्याबरोबरच रायपूर, नाशिक, संगमनेर, जळगाव, बेळगाव, दिल्लीमध्ये, तर डॉ. राज लाला यांच्यामार्फत सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अहिल्यानगर, गोंदिया येथे मोफत प्लॉस्टिक सर्जरी शिबीरे आयोजित केली आहेत.
‘या शिबिरात मुख्यत्वे दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील विद्रूप वर्ण व डाग, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती, फुगलेले गाल, चिकटलेली बोटे अश्या प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत’, असे शिबीर प्रमुख शशिकांत मुनोत यांनी सांगितले. ‘पहिल्या दिवशी गुरुवारी दि. २ जानेवारीला सकाळी ९.०० ते १२.०० पर्यंत फक्त रुग्णांची नोंदणी व तपासणी, तर असून उर्वरित वेळेत शस्त्रक्रिया पार पडणार आहेत. या शिबिराविषयी अधिक माहितीसाठी विजय पारख (९८२२४२४३१६) आणि नितिन शहा (९६०४९१३२९६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बीजेएसचे पदाधिकारी आनंद छाजेड यांनी केले आहे.