‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची ‘सीईजीआर’च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी फेरनियुक्ती

‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची ‘सीईजीआर’च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी फेरनियुक्ती

पुणे : पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची नवी दिल्ली येथील सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्चच्या (सीईजीआर) राष्ट्रीय उपाध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. नोएडा येथील फिल्म सिटीतील मारवाह स्टुडिओमध्ये नुकत्याच झालेल्या ‘सीईजीआर’च्या वार्षिक बैठकीत ‘सीईजीआर’चे मेंटॉर आणि नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिएशनचे चेअरमन प्रा. के. के. अगरवाल व शोबित विद्यापीठाचे कुलपती कुंवर शेखर विजेंद्र यांच्या हस्ते प्रा. डॉ. चोरडिया यांच्याकडे कार्यभार सुपूर्त करण्यात आला व नियुक्तीबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.

‘सीईजीआर’ ही संस्था देशातील शिक्षण क्षेत्रासाठी कार्यरत असलेला एकमेव आणि नामांकित असा विचार गट आहे. शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी शिक्षणतज्ज्ञ, माध्यमे आणि धोरणकर्ते यांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. सोबतच संशोधन आणि इनोव्हेशनच्या साहाय्याने व्यापक शिक्षणवृद्धीचा प्रयत्न याद्वारे केला जातो. ‘सीईजीआर’मध्ये १० हजारांपेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, संशोधक यांचा समावेश आहे. ‘सीईजीआर’ नॅशनल कौन्सिलवर केरळचे राज्यपाल, नॅशनल बोर्ड ऑफ एक्रेडिएशन (एनबीए), अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेतील (एआयसीटीई) नियंत्रक, देशाच्या विविध भागातील ७० कुलपती, कुलगुरू आदींचा सहभाग आहे. एकाच दिवशी १४ राज्यात ५६ कार्यक्रम घेणारा ‘सीईजीआर’ हा एकमेव शैक्षणिक विचार गट आहे. त्याला इंडियन एज्युकेशनल फेस्टिवल संबोधले जाते. या फेस्टिव्हलमुळे एका दिवसात १२,५०० लोकांना लाभ होतो.

२०२२ या वर्षाकरिता ‘सीईजीआर’ची नॅशनल कोअर कमिटी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून डॉ. संदीप मारवाह (कुलपती, एएएफटी विद्यापीठ), वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून डॉ. रमेश उन्निकृष्णन (सल्लागार, एआयसीटीई), डॉ. आर. के. सोनी (सल्लागार, एआयसीटीई), व्ही. एम. बन्सल (चेअरमन, एनडीआयएम), डॉ. मधू चित्कार (कुलगुरू, चित्कार विद्यापीठ), डॉ. अश्वनी लोचन (चेअरमन, अरुणाचल युनिव्हर्सिटी ऑफ स्टडीज), राकेश छरिया (सरचिटणीस, आयएमएस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स), डॉ. रवीश जैन (कुलपती, प्रेस्टिज युनिव्हर्सिटी), राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व डॉ. संदीप पाचपांडे यांची, तर सदस्य चिटणीस म्हणून रविश रोशन (संचालक, सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देशभर वेबिनार्स, सेमिनार्समध्ये भाग घेण्यासह यशस्वी आयोजन केले. सूर्यदत्तामध्ये विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध नवोपक्रम राबवले. दुसऱ्या व्यवस्थापन परिषदेला, तिसऱ्या संशोधन व इनोव्हेशन समिटला, इंडस्ट्री-अकॅडमी समन्वयक यावरील सीईजीआरच्या चौथ्या समिटला प्रा. डॉ. चोरडिया यांनी संबोधित केले. प्रादेशिक भाषांमधून तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन देत त्यांनी अनेक वेबिनार्समध्ये बीजभाषक म्हणून मार्गदर्शन केले. माध्यमे, मनोरंजन आणि समांतर विषयात त्यांनी संधी निर्माण केल्या. रोजगाराभिमुख कौशल्यप्रशिक्षण, प्रभावी तंत्रज्ञानारीत शिक्षण, संशोधन, मान्यता आणि दर्जात्मक शिक्षण यावर अनेक वेबिनार्स घेतले. सर्वांगीण शिक्षणासाठी महत्वपूर्ण सल्ला व मार्गदर्शन देणाऱ्या प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची याच कार्याच्या आधारावर फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

प्रा. के. के. अगरवाल म्हणाले, “एकाच व्यासपीठावर शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ एकत्र पाहून आनंद होतोय. शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख रेखाटायचा झाला, तर त्या देशातील शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांची संख्येवरून तो चांगल्या रीतीने रेखाटता येईल. आज आपल्या देशातील शिक्षकांच्या समोर अनेक आव्हाने आहेत. परंतु त्याला सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. यश आणि अपयश याच्या व्याख्या करणे खूप कठीण असले, तरी त्याचा समतोल साधने हे अतिशय महत्वाचे आहे. शिक्षण क्षेत्रातील हाच समतोल साधण्यासाठी ‘सीईजीआर’ काम करतेय, ही पूरक गोष्ट आहे.”

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी आपल्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ. चोरडिया म्हणाले, “शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची दुसऱ्यांदा संधी मिळणे आनंददायी आहे. देशभरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक, कुलगुरू, उद्योजक, संशोधक यांच्या विचारमंथनातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बाबतीत उहापोह होतो. भावी पिढीला अधिकाधिक चांगले शिक्षण देण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा वृद्धिंगत करण्यासाठी ‘सीईजीआर’च्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे.”

“सूर्यदत्ता शिक्षण संस्थेतर्फे गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित आणि कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही गेली दोन दशके करत आहोत. देशभरात शिक्षण क्षेत्रात होत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम संस्थेत राबविण्यास मदत होते. तसेच आमच्या येथील अनेक चांगले आणि सर्वांगीण विकासाचे उपक्रम राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. दर्जेदार शिक्षण सर्वच स्तरांतील विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध झाले, तर विद्यार्थ्यांचा, कुटुंबीयांचा, समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास सध्या होईल,” असेही प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *