चिपळूणमधील पूरग्रस्त व्यापारी यांना आठ दिवसात तातडीची मदत मिळणार;

चिपळूणमधील पूरग्रस्त व्यापारी यांना आठ दिवसात तातडीची मदत मिळणार;

आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली खासदार शरद पवार यांची भेट. चिपळूण/ विलास गुरव. चिपळूणमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या महापुरात व्यापारीवर्गाचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाने व्यापार्यांना तातडीने ५० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर केली होती, मात्र महिना उलटला तरी अद्याप ही मदत प्राप्त झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुरूवार दि. २ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा. शरद पवार यांची भेट घेतली.शरद पवार यांच्या समोर व्यापारीवर्गाचे प्रश्न व व्यथा मांडण्यात आल्या. पवार यांनी तातडीने पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्याशी चर्चा केली. शासनाकडून व्यापारी व्यावसायिकांना आठ दिवसात आर्थिक मदत दिली जाईल, असे सांगण्यात आले, तसेच यावेळी वाशिष्ठी नदीला वारंवार येणारे पुर याबाबत ग्लोबल चिपळूण टुरिझमचे रामशेठ रेडीज व शाहनवाज शहा यांनी मा. शरद पवार व अजितदादा पवार यांच्यासमोर महापुराची कारणे पीपीटीव्दारे सादर केली. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी येत्या आठवड्यात जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेण्याचे जाहीर केले. या शिष्टमंडळामध्ये व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष काटकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, युवा कार्यकर्ते अक्षय केदारी, रामशेठ रेडीज, शाहनवाज शहा आदी आमदार शेखर निकम यांच्यासोबत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *