फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे ससून रुग्णालयाला ‘एन्डोस्कोपी मशीन’चे हस्तांतरण

फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे ससून रुग्णालयाला ‘एन्डोस्कोपी मशीन’चे हस्तांतरण

ससून सर्वोपचार रुग्णालय सामान्य रुग्णांसाठी आशास्थान : डॉ. विनायक काळे

पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज व त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने ससून सर्वोपचार रुग्णालयाला पचनसंस्था विकार निदान व उपचार यंत्र (एन्डोस्कोपी मशीन) हस्तांतरित करण्यात आले.

क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संदीप खर्डेकर, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा पूजा मनीष आनंद, उद्योजक विजय बजाज, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, एन्डोस्कोपी तज्ज्ञ डॉ. विनय थोरात, विभागप्रमुख डॉ. आर. टी. बोरसे यांच्यासह मुकुल माधव फाउंडेशन व ससूनमधील डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थितीत होते.

डॉ. विनायक काळे म्हणाले, “गोरगरिबांसाठी असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयात दानशूरांच्या मदतीने अत्याधुनिक उपचार उपलब्ध होत आहेत. पुण्यासह राज्याच्या इतर जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचार घेतात. सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आमचे सर्व डॉक्टर्स, नर्स आणि इतर सहयोगी स्टाफ मेहनत घेत असून, मुकुल माधव फाउंडेशन सारख्या संस्था पाठबळ देत आहेत. त्यातून ससूनकडे सामान्य रुग्ण आशास्थान म्हणून पाहत आहेत.”

काळे यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांचे विशेष आभार मानले. या अत्याधुनिक मशीनमुळे रुग्ण तपासणी अधिक जलद व अचूक होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे समाजातील अधिकाधिक रुग्णांना याचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वास डॉ. काळे यांनी व्यक्त केला.

डॉ. विनय थोरात म्हणाले, “फाउंडेशनची आम्हाला कायमच मदत असते. जे उपचार परदेशात मिळतात; पुण्यातील अन्य रुग्णालयांत मिळत नाहीत, ते आता ससूनमध्ये मिळू शकतात. अत्याधुनिक व तंत्रज्ञानात्मक निदान व उपचार ससूनमध्ये माफक दरात उपलब्ध होताहेत, याची नोंद समाजाने घ्यायला हवी.”

संदीप खर्डेकर म्हणाले, “समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. मुकुल माधव फाउंडेशनशी माझा कोरोना काळात अधिक संबंध आला. या काळात फाउंडेशनने केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या स्वरूपाचे काम छाब्रिया दाम्पत्य करत आहे. ससून रुग्णालयाच्या अत्याधुनिकरणात त्यांची मोलाची भूमिका राहिली आहे.”

मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकारातून २०१८ मध्ये येथे पचनसंस्थाविकार निदान व उपचार केंद्राचे (एन्डोस्कोपी युनिट) ‘मोहिनी व प्रल्हाद छाब्रिया’ यांच्या स्मरणार्थ लोकार्पण झाले होते. सध्या या विभागात दरवर्षी २५०० ते ३००० हजार रुग्णांवर निदान व उपचार होत आहेत. या नव्या यंत्रामुळे रुग्णांना आणखी अत्याधुनिक सुविधा मिळेल, असे बोरसे यांनी नमूद केले.

पूजा आनंद यांनीही फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले. समाजातील दुर्लक्षित भागांना, घटकांना मोठी मदत रितू छाब्रिया फाउंडेशनच्या माध्यमातून करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *