पुणे : राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या राज्यातील विविध १४ प्रकारच्या शिष्यवृत्तींसाठी इच्छुकं आणि पात्र विद्यार्थ्यांना येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन या विभागाचे सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे यासाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. या शिष्यवृत्ती अर्जाबाबातच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही बॉदर यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील विविध शिष्यवृत्तींमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक साहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य योजना (कनिष्ठ स्तर) व (वरिष्ठ स्तर), राज्य सरकारची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची शिष्यवृत्ती, राज्य सरकारची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्याथ्र्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, आदींचा समावेश आहे.