पुनर्बांधणीच्या पार्श्वभूमीवर निर्यात वाढणार; औषध आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रात मोठी संधी

पुनर्बांधणीच्या पार्श्वभूमीवर निर्यात वाढणार; औषध आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रात मोठी संधी

पुणे : अमेरिका-इराण संघर्षातील तात्पुरत्या शस्त्रसंधीमुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा फायदा घेत भारतीय कंपन्यांनी आपली हालचाल वेगवान केली आहे. युद्धकाळात थांबलेली निर्यात पुन्हा सुरू करण्यावर कंपन्यांचा भर असून, पुढील काळात पुनर्बांधणीमुळे ऑर्डर्समध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः औषधनिर्माण क्षेत्रात मागणी वाढल्याचे दिसून येत आहे, कारण युद्धग्रस्त देश औषधांचा साठा पुन्हा भरत आहेत.
ET च्या अहवालानुसार, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वायर आणि केबल्स तयार करणाऱ्या कंपन्याही वाढीव मागणीसाठी सज्ज आहेत. मागील महिनाभर चाललेल्या मध्य-पूर्वेतील तणावामुळे व्यवसायात 40-50% घट झाली होती. मात्र, Havells India चे सीईओ अनिल राय गुप्ता यांच्या मते, भारताचे या प्रदेशाशी असलेले मजबूत संबंध आणि भौगोलिक जवळीक यामुळे पुनर्बांधणीच्या प्रक्रियेत भारताला मोठा वाटा मिळू शकतो. कंपनीच्या निर्यात महसुलापैकी सुमारे 40% हिस्सा पश्चिम आशियातून येतो, त्यामुळे केबल आणि वायर क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर हॅवेल्स इंडियाच्या शेअर्समध्ये सलग वाढ नोंदवली जात आहे.
दरम्यान, AWL Agri Business ने दुबईच्या जेबेल अली बंदरावर पुन्हा माल पाठवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे पुरवठा साखळी सुरळीत होण्याची चिन्हे आहेत. कंपनीच्या मते, जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढत असून दरमहा 4,000 ते 5,000 टन माल पाठवला जाऊ शकतो.
शस्त्रसंधीमुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक हळूहळू सुरू होत आहे. पारले उत्पादने आणि डाबर इंडिया यांसारख्या कंपन्यांचे स्थानिक कारखाने पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यरत होत आहेत. पारले चा बहरीनमधील कारखाना, जो आधी 70-80% क्षमतेवर होता, तो आता पूर्ण क्षमतेने सुरू होण्याच्या मार्गावर आहे. ब्लू स्टार सारख्या कंपन्याही पुनर्बांधणीसाठी वाढलेल्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी तयारीत आहेत.
याशिवाय, जलवाहतूक मार्ग पुन्हा सुरू झाल्यामुळे लघु व मध्यम उद्योगांनाही (SMEs) दिलासा मिळाला आहे. लॉजिस्टिक्समधील अडथळे कमी होत असून, मालवाहतूक व विमा खर्चात घट होण्याची शक्यता आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्टचे महासंचालक अजय सहाय यांच्या मते, शस्त्रसंधीमुळे व्यापाराला चालना मिळेल, मात्र परिस्थिती अजूनही अनिश्चित असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.