समितीच्या विद्यार्थिनींनी अनुभवले ‘माहेरपण’

समितीच्या विद्यार्थिनींनी अनुभवले ‘माहेरपण’

समितीच्या विद्यार्थिनींनी अनुभवले ‘माहेरपण’
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात
 
पुणे: वसतिगृहातील जुन्या आठवणींना उजाळा देत सुखी-संसाराच्या, करिअरच्या अन मुलाबाळांच्या गप्पागोष्टी करत विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा माहेरपण अनुभवले. माहेरच्या प्रेमाने, आपुलकीने भारावलेल्या या माहेरवासिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचा गोडवा पाहायला मिळाला.निमित्त होते, विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने माजी विद्यार्थिनींच्या मेळाव्याचे! ‘मिळुनी साऱ्याजणी, पुन्हा समितीच्या अंगणी’ म्हणत वेगवेगळ्या बॅचमधील सुमारे १०० माजी विद्यार्थिनींनी स्नेहमेळाव्यात सहभागी होत समितीतील जगण्याचा आनंद घेतला. गाणी, सामूहिक खेळ, गप्पाटप्पा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.

समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष गणेश काळे, उपाध्यक्ष अनिल खेतमाळीस, सचिव मनीषा गोसावी, विद्यार्थी विकास केंद्राचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, मंडळाचे खजिनदार ऍड. देविदास टिळे, निसार चौघुले, सुनील चोरे, संभाजी सातपुते, अभय व्यवहारे, गणेश ननवरे, माजी विद्यार्थिनी व पुणे नगरपालिकेच्या सहायक आयुक्त सुरेखा भणगे यांच्यासह समितीचे व मंडळाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

गणेश काळे म्हणाले, “समितीतून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांची संख्या दहा हजारांवर आहे. मात्र, मंडळाची सदस्य संख्या फक्त ८०० आहे. त्यामुळे सदस्य वाढवण्यासाठी काम करावे लागेल. यासह मंडळाने सर्वांचे लाडके पर्यवेक्षक कै. रमाकांत तांबोळी सरांच्या चिरंतन स्मृतीसाठी पुढील तीन वर्षात पाच कोटी रुपयांचा निधी उभारून समितीला देणगीरूपात देण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. यामध्ये प्रत्येक माजी विद्यार्थ्याने योगदान द्यावे.”

तुषार रंजनकर यांनी समितीच्या विस्ताराविषयी माहिती देतानाच विद्यार्थ्यांमागील तूट भरून काढण्यात माजी विद्यार्थ्यांनी योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच पाल्य-पालक योजनेत माजी विद्यार्थ्यांनी सहभाग वाढवून आजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायला हवे, असे सांगितले.

विशेष प्राविण्य, पुरस्कार मिळवलेल्या व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थिनींचा, तसेच निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. अनिता देशपांडे व ऍड. प्रार्थना सदावर्ते यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *