मुलांमध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयोगशील

मुलांमध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयोगशील

प्रसाद भडसावळे यांची भावना; ‘वंचित विकास’तर्फे निर्मळ रानवारा कृतज्ञता पुरस्काराने सन्मान

पुणे : “बाबा पुस्तक विक्रेते असल्याने लहान वयापासून पुस्तकांशी संवाद वाढला. पुस्तकांत रमलो. आयुष्यभर वाचन आणि पुस्तक भेट सुरु आहे. आजवर ७५ हजाराहून अधिक पुस्तके दान केली. कोरोना काळात अनेकांना पुस्तके भेट दिली. वाचनाची आवड लहानपणापासून लागावी, यासाठी ‘निर्मळ रानवारा’ सारखी मासिके उपयोगी आहेत, मुलामध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयोगशील व उपक्रमशील काम करत राहीन,” अशी भावना पुस्तकप्रेमी व बालसाहित्यिक प्रसाद भडसावळे यांनी व्यक्त केली.

 
वंचित विकास संचालित निर्मळ रानवारा मासिकातर्फे दिला जाणारा ‘निर्मळ रानवारा कृतज्ञता पुरस्कार’ बालसाहित्यिक प्रसाद भडसावळे यांना प्रदान करण्यात आला. लक्ष्मी रोडवरील हुजूरपागा हायस्कुलमध्ये झालेल्या कार्यक्रमात अभिरुची वर्ग आणि फुलवातील मुलांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. प्रसंगी लेखक मिलिंद सबनीस, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पुरकर, बालसाहित्यिक ल. म. कडू, वंचित विकास संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, वरिष्ठ पत्रकार श्रीराम ओक, ‘निर्मळ रानवारा’च्या संपादिका ज्योती जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी ‘निर्मळ रानवारा’मधील बाललेखक व बालचित्रकारांना ‘इंदिरा गोविंद पुरस्कार’ देण्यात आले. मधुरा सकलकले, सई बार्शीकर, सबा अन्सारी यांना ‘निर्मळ रानवारा’च्या मुखपृष्ठासाठी, तर रिया वजरेकर हिला जुलैच्या अंकातील कवितेसाठी गौरवण्यात आले. वि. ल. शिंत्रे कथा स्पर्धेत मृणाल शामराज यांना प्रथम, चंचल काळे यांना द्वितीय, राघवेंद्र वंजारी यांना तृतीय, तर लीना मोघे आणि क्षितीजा देव यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. या कथा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
 
मेधा पुरकर म्हणाल्या, लहान मुलांना वाचायला लावणारे हे ‘निर्मळ रानवारा’ मासिक आहे. माझ्याकडे अनेक मुले परदेशी भाषा शिकण्यासाठी येतात. मला वाटते, आधी आपली मातृभाषा शिका. त्याचा अभ्यास करा आणि मग इतर भाषा शिका. आपल्या मातृभाषेविषयी खंत वाटून घेऊ नका.”

मिलिंद सबनीस म्हणाले, “मुलांना केवळ सांगून त्यांच्या मनात वाचनवेड निर्माण होत नाही, तर त्याच्या कलेने प्रयत्न करून त्यांच्यात वाचण्याविषयी आवड निर्माण करता यावी. भडसावळे सरांना हे शक्य झाले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या त्यांच्या शाळेतील ग्रंथालयाला अवश्य भेट द्यावी. तिथे गेल्यानेच आपोआप आपल्याला वाचण्याची इच्छा निर्माण होते.”

प्रास्ताविक तृप्ती फाटक यांनी केले. स्वागत परिचय श्रीराम ओक यांनी केले. देवयानी गोंगले यांनी वंचित विकास संस्थेची माहिती सांगितली. चैत्राली वाघ यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. स्नेहल मसालिया यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *