शिवभक्त आनंद गोरड यांची मागणी; जिजाऊ माँसाहेब, महाराजांनी वास्तव्य केलेल्या खेडशिवापूर येथील वाड्याचे संवर्धन व्हावे
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्यातून समाजाला प्रेरणा मिळावी, सुसंकृत समाजाची निर्मिती व्हावी आणि महाराजांच्या कर्तृत्वाची ओळख संपूर्ण जगाला व्हावी, यासाठी पुतळे, भव्यदिव्य स्मारक उभारणे हे योग्य आहेच. परंतु त्याआधी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या, हिंदवी स्वराज्याची निर्मिती व अन्य महत्वपूर्ण घटनांची साक्षीदार असलेल्या खेडशिवापूर येथील वास्तूचे जतन व्हावे, अशी मागणी मावळ मराठा इतिहास संशोधन, संवर्धन व प्रसारण परिषदेचे संस्थापक शिवभक्त आनंद गोरड यांनी केली.
आनंद गोरड म्हणाले, “शहाजी महाराजांनी वसवलेल्या खेड शिवापूर (खेडे बारे) या गांवात राजमाता जिजाऊसाहेब व शिवाजी महाराजांनी वास्तव्य केले. येथील वाड्यातून बारा मावळातील ३५० वर्षांची सुलतानी वतनदारी नष्ट करून ‘रयतेचे हिंदवी स्वराज्य’ स्थापन्याचा विश्वास निर्माण केला. राजमुद्रेची प्रस्थापना केली. रयतेच्या मनात सुशासन, स्त्रियांचा सन्मान, सुरक्षित वातावरण तयार करण्यासह आरोपींना कठोर शिक्षा फर्मावत न्यायनिवाडेही याच वाड्यातून केले गेले. महाराजांच्या सैन्याचे मुख्यालय असलेल्या या वास्तूची आज दुरावस्था झालेली आहे. हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार असलेल्या या अत्यंत महत्वाच्या ऐतिहासिक वास्तुकडे मात्र सर्वच राजकीय नेत्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे पाहून व राज्यामध्ये स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घृणास्पद व संतापजनक घटनांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असणारे प्रेम व आदर किती खरे आहे, हे दिसून येत आहे.”
“महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या व हिंदवी स्वराज्य स्थापनेचे मुख्य केंद्र असलेल्या या पवित्र ऐतिहासिक वास्तूचे जतन करून शासनाने महाराजांचे यथोचित स्मारकरुपी संस्कारपीठ, शक्तिपीठ उभारावे. याच वास्तूमध्ये महाराजांनी भगिनींवर अत्याचार करणाऱ्या रांजे गावच्या पाटलाचा दोन्ही हात-पाय कलम करून चौरंगा केला. येथेच मावळ्यांना सोबत घेऊन रायरेश्वरावर हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली व आपल्या जहागीरीचा संपूर्ण प्रदेश हा ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणून घोषित केला. कोणत्याही सुलतानाला शेतसारा द्यायचा नाही, असे फर्मान काढले. शेतसारा गोळा करण्यासाठी देण्यात आलेले सुलतानी वतनाचे शिक्के बेदखल केले. वतनदारांना हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतले. अशा या ऐतिहासिक वास्तूकडे शासन व सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असेही आनंद गोरड यांनी नमूद केले.