गोरगरिबांचे अश्रू पुसणे गुन्हा आहे का?
गणेश भोकरे यांचा सवाल? मुलांची फी भरल्याप्रकरणी आयोगाची नोटीस
पुणे: गोरगरिबांचे अश्रू पुसणे, फीअभावी शिक्षणापासून वंचित मुलांना मदत करून त्यांना पुन्हा शाळेची दारे खुले करणे गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल करीत माझ्या मायबाप जनतेला मदत करणे गुन्हा असेल, तर असे शेकडो गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे, अशी स्पष्ट भूमिका कसबा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी मांडली.
हलाखीच्या आर्थिक स्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या मातेची व्यथा ऐकल्यानंतर संवेदनशील मनाच्या गणेश भोकरे यांनी प्रचाराच्या धावपळीतून वेळ काढत निवडणूक खर्चाला कात्री लावून दोन्ही मुलांच्या शाळेची परीक्षा फी भरली होती. त्यानंतर या दोन्ही मुलांच्या शाळेची दारे पुन्हा खुली झाली होती. मात्र, या घटनेवर आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी भोकरे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना, प्रचारसभांचा धुराळा उडत असताना भोकरे यांना नोटीस आल्याने मतदारसंघात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. भोकरे यांच्या झंझावाताने दोन्ही प्रस्थापित उमेदवारांना घाम फोडला आहे. त्यामुळेच भोकरे यांना अडचणीत आणण्याचा हा डाव असल्याचे बोलले जात आहे.
गणेश भोकरे म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील पात्रे ताईंनी त्यांची व्यथा माझ्याकडे मांडली. त्यांच्या भावना ऐकून मला फार वाईट वाटले. निवडणूक जात-येत राहील. पण त्या मायमाऊलीच्या चेहऱ्यावरचे दुःख मला बघवले नाही. त्यांच्या मुलांची शाळा बुडू नये, म्हणून तातडीने शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यांची परीक्षा फी भरली. आठवी व नववीत शिकणाऱ्या या मुलांची फी भरून काही चूक केली असेल, तर असे असंख्य गुन्हे अंगावर घेण्याची माझी तयारी आहे. मनसैनिक कोणत्याही गुन्ह्याला घाबरत नाही. जे लोक काम करत नाहीत. त्यांच्यावर कोणतेही गुन्हे नसतात. माझे काम लोकांच्या हिताचे असते. मी काम करतो, म्हणून गुन्हे दाखल करायचे असतील, तर खुशाल करावेत.”