पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आठवे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन येत्या ९ ऑगस्ट २०२१ रोजी होत आहे. संमेलनांमध्ये बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रशांत रोकडे यांना कर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बंधुताच्या धर्ममैत्री अभियानापासुन ते साहित्य संमेलनांच्या यशस्वितेसाठी निष्ठेने केलेल्या कार्याबद्दल रोकडे यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे व परिषदेचे सरचिटणीस शंकर आथरे यांनी दिली.
ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी खरात यांच्या अध्यक्षतेखाली ९ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन जेष्ठशिक्षणतज्ञ हरिश्चंद्र गडसिंग यांच्या हस्ते होईल. ॲड. राम कांडगे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहील. याप्रसंगी सूर्यकांत सरवदे, रविंद्र जाधव आणि चंद्रकांत सोनवणे या विद्यार्थ्यांना साने गुरुजी गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने गौरविण्यात येईल. त्यानंतर प्रसिद्ध कवी चंद्रकांत वानखेडे यांचा ‘जाऊ कवितेच्या गावा’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल.
दुपारच्या सत्रात बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारोप समारंभात माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते प्रसिद्ध उद्योजिका डाॅ. प्रीती काळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गजानन वाव्हळ, अनिल जायभाय, डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. संजय नगरकर आणि विकास रानवडे यांना साने गुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यावेळी प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे डॉ. आंधळे यांनी नमूद केले.