डॉ. दत्ता कोहिनकर यांचे प्रतिपादन; सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनचा बारावा दीक्षांत सोहळा
—————————————————–
सर्वांगीण नागरिक घडविण्याचे ‘सूर्यदत्ता’चे परिश्रम उल्लेखनीय
अच्युत मेढेकर यांचे मत; सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनचा बारावा दीक्षांत सोहळा
—————————————————–
विद्यार्थ्यांनी अद्ययावत राहत आरोग्याचे, सामाजिक जबाबदारीचे भान जपावे
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनचा बारावा दीक्षांत सोहळा
पुणे : “आयुष्यात कितीही मोठे झालात, तरी अध्यात्माशी जोडून राहा. शिक्षणाला नैतिक मूल्यांची, निःस्वार्थ सेवाभावाची जोड द्या. ध्यानधारणा करा. चांगल्या संस्कारांना अंगिकारा. पैसे कमवणे मुख्य हेतू नसून, उत्तम माणूस म्हणून घडणे महत्वाचे आहे. निस्वार्थी भावनेतून काम करणाऱ्या लोकांना यश हमखास मिळते,” असे प्रतिपादन विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख, माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी केले.
सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनच्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दत्ता कोहिनकर बोलत होते. प्रसंगी अशोक लेलँड लिमिटेडचे माजी उत्पादन प्रमुख अच्युत मेढेकर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, ‘पीजीडीएम’चे प्रमुख प्रा. हर्षद भडंगे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्य हस्ते डॉ. दत्ता कोहिनकर यांना समाजातील लोकांच्या कल्याणासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेबद्दल ‘प्रोफेसर इमेरिटस’ ही पदवी प्रदान करण्यात आली. या अभ्यासक्रमामध्ये प्रियंका सिन्हा प्रथम, तर संस्कृती मिश्राने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे सुवर्णपदक व रौप्यपदक प्रदान करण्यात आले. डेलॉइट कन्सल्टिंगचे स्ट्रॅटेजी कन्सल्टंट प्रणव नाईक यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन बैठकीद्वारे संबोधित केले.
डॉ. दत्ता कोहिनकर म्हणाले, “देशाच्या प्रगतीत आपले योगदान देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आपण पेरतो, ते उगवते. त्यामुळे कितीही पदव्या घेतल्या, मोठमोठ्या पदांवर पोहोचलो. तरी आपले आई-वडील, शिक्षक यांच्याप्रती कायम आदर ठेवला पाहिजे. त्यांच्या कष्टामुळेच आपण इथवर आलेलो असतो. आपल्या कामात प्रामाणिकपणा, सचोटी, सातत्य, नम्रता असायला हवी.”
अच्युत मेढेकर म्हणाले, “सूर्यदत्ता संस्था केवळ चांगले व्यवस्थापकच घडवत नाही, तर एक उत्तम व्यक्तिमत्व घडवत आहे. भारताचा चांगला नागरिक बनून समाजाच्या, देशाच्या हितासाठी उत्तमोत्तम काम करत राहावे. आपल्यातील नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव जागृत ठेवून काम करत राहावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, चांगला माणूस घडविण्यासाठी सूर्यदत्ता परिवार आणि डॉ. संजय चोरडिया घेत असलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. उद्योगाभिमुख, रोजगाराभिमुख, कौशल्याभिमुख विद्यार्थी येथून बाहेर पडत आहेत, ही उद्योग जगतासाठी उपयुक्त बाब आहे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “केवळ पदवी मिळाली म्हणजे सगळे झाले असे नाही, तर विविध क्षेत्रामध्ये काम करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम करा. आपले आरोग्य, पर्यावरण जपणे गरजेचे आहे. आजच्या घडीला काम करताना तुम्ही स्वतःला अद्ययावत ठेवा. आता तुम्ही ‘सूर्यन्स’ झाला आहात, त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सूर्यदत्ता परिवार तुम्हाला मार्गदर्शन व सहकार्य करेल. विद्यार्थ्यांच्या पाठ्यक्रमासह संस्कारांचे, मूल्यांचे शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सूर्यदत्ता कायम अग्रभागी राहिल.”
“सूर्यदत्तामध्ये तुम्हाला मिळालेले संस्कार, सात स्तंभाची शिकवण विसरू नका. मोकळ्या वेळात सामाजिक कार्य, प्रशिक्षण उपक्रमात सहभागी व्हा. स्वतःची वेगेळी ओळख चांगल्या कामातून तयार करा. चांगले गुण, सकारात्मक विचार आत्मसात करा. दिवसाचे नियोजन करा. जिथे काम करता ते आपले स्वतःचे काम आहे, या भावनेतून योगदान द्या. जीवनात यशस्वी होण्यासह राष्ट्रसेवेसाठी आपल्या हातून काम होईल, यावर लक्ष द्या. भावी पिढीसाठी आता उपलब्ध स्त्रोतांचे संवर्धन करा,” असा मोलाचा सल्लाही प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.
प्रियंका सिन्हा आणि संस्कृती मिश्रा यांनी संस्थेबद्दल त्यांच्या भावना व कृतज्ञता व्यक्त केली. प्रा.खुशाली ओझा यांनी आभार मानले. प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे यांच्या नेतृत्वात प्रा. डॉ. मेधा देशमुख, प्रा. हर्षद भडंगे, प्रा. नीलम तोतलानी यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.