कर्करोगतज्ज्ञ डॉ. शैलेश पुणतांबेकर यांचे मत; ‘सूर्यदत्त’मध्ये कर्करोग तपासणी शिबीर
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसतर्फे (एसआयएचएस) नुकतेच संस्थेच्या बावधन येथील कॅम्पसमध्ये मोफत कर्करोग तपासणी, प्रतिबंधतता आणि जागरूकता शिबिराचे आयोजन केले होते. सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या २४ व्या वर्धापनदिनाच्या, तसेच जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘हेल्थ अवेरनेस मंथ’ या अनोख्या उपक्रमाअंतर्गत हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. प्रसंगी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, अधिष्ठाता व संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्राचार्य प्रा. डॉ. सिमी रेठरेकर, डॉ. कल्याणी शिवरकर, डॉ. कांचन घोडे, डॉ. नेहा भोसले, दंतचिकित्सक डॉ. अर्पिता धोपडे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. दीप्ती सालेर, फिजिशियन डॉ. किरण जोगवाडे, उमाकांत उपाध्याय, प्रेमलता राघव, जगजीत सिंग, अक्षय देटके आदी उपस्थित होते.
या शिबिरात तोंडाचा, स्तनाचा, प्रोस्टेट, फुफ्फुसाचा, रक्ताचा, माणक्याचा कर्करोग याची तपासणी यासह मॅमोग्राफी, रक्तातील साखरेचे प्रमाण, इतर रक्त तपासणी करण्यात आली. अत्याधुनिक, सर्व संसाधनांनी सुसज्ज अशा मोबाईल युनिट व्हॅन शिबिरामध्ये होती. फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंत चिकित्सक, फिजिओथेरपीस्ट, भुलतज्ज्ञ, कर्करोग तज्ज्ञांच्या उपस्थितीत हे शिबीर झाले.
सुर्यदत्त संस्थेतील सर्व स्टाफ, १४ वर्षांवरील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी, भागधारकांनी या शिबिरात सहभाग घेतला. जवळपास १२० लोकांनी कर्करोग तपासणी करून घेतली. सुर्यदत्त संस्थेच्या परिसरातील नागरिक स्वयंसेवी संस्थांचे सभासद, बावधनसह मुळशी, हवेली आणि मावळ तालुक्यातील लोकांनी यात सहभाग नोंदवला. ललित गांधी व संदीप भंडारी यांनी तपासणी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिली. आरोग्य तपासणी शिबीर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून झाले.
कर्करोगाविषयी मार्गदर्शन करताना डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, “मणक्याचा, स्तनाचा कर्करोग लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर स्वतःच परीक्षण आणि नियमित तपासणी केली पाहिजे. अशा प्रकारचे कर्करोग लवकर निदान झाले, तर वेळीच उपचार करून त्याला बरे होण्यास मदत होते. अनपेक्षित वेळी रक्तस्त्राव झाला, तर ते कर्करोगाचे लक्षण असून, तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये कर्करोग हा अतिशय सामान्य झाला असला, तरी याबाबत जागरूकता करण्याची अधिक गरज आहे. महिलांनी चाळीशीच्या आधी मॅमोग्राफी करू नये. कारण त्याची लक्षण लवकर दिसून येत नाहीत. केवळ तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान करणाऱ्यांनाच कर्करोग होतो, हा गैरसमज आहे.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “कर्करोग हे जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमुख कारण आहे, जे जवळजवळ १० दशलक्ष मानवी जीवनांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवते. मानसिक वेदना आणि उपचारांच्या प्रचंड खर्चामुळे कर्करोगाच्या रुग्णांच्या कुटुंबांना नष्ट करते. बहुतेक रूग्णांना हा रोग प्रगत अवस्थेत आढळून येतो आणि त्यावेळी जगण्याची आशा फार कमी असते. प्रतिबंध आणि लवकर ओळख हाच मौल्यवान जीव वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे. कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे; आपण जागरूकता पसरवण्यासाठी आणि त्याचे निर्मूलन करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे.”
डॉ. सिमी रेठरेकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सुनील धाडीवाल यांनी आभार मानले.