पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या गांधी जयंतीनिमित्त आयोजित गांधी सप्ताहानिमित्त दिला जाणारा ‘सूर्यदत्त गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड-२०२३’ यंदा ज्येष्ठ साहित्यिक व पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना जाहीर करण्यात आला आहे. गांधीवादी तत्त्वज्ञानाची मांडणी, बंधुतेच्या विचारांची पेरणी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार देत डॉ. सबनीस यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्लोबल पीस रिसर्च फाऊंडेशनतर्फे येत्या सोमवारी (दि. ९ ऑक्टोबर) दुपारी ४ वाजता बावधन कॅम्पसमध्ये आयोजित ‘सूर्यदत्त नॅशनल कॉनक्लेव्ह ऑन गांधीयन फिलॉसॉफी’ व गांधी सप्ताहाच्या समारोपावेळी डॉ. सबनीस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया असणार आहेत.
यापूर्वी, हा पुरस्कार पद्मभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांसह गांधीवादी विचार जगणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीद्वारे या पुरस्काराची निवड करण्यात येते. मानपत्र, स्कार्फ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.