पुणे, दि. १ – “चांगल्या कामासाठी निधी संकलन सामाजिक अभिसरणाचा महत्वपूर्ण घटक आहे. संस्थेच्या कार्याला पुढे घेऊन जाणारा हा उपक्रम कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो. त्यामुळे चांगल्या कामासाठी मदत मागायला कधीही लाजू नका. निर्मळ मनाने मागितलेली मदत सढळ हाताने देणारे दानशूर समाजात आहेत,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे (Dr. Sadanand More, former president of the All India Marathi Literature Conference and scholar of Sant literature) यांनी केले.
(Dr. Sadanand more said)डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “समाज घडवणाऱ्या डेक्कन कॉलेज, गोखले इन्स्टिट्यूट, भारत इतिहास संशोधक मंडळ, भांडारकर इन्स्टिट्यूट याप्रमाणेच विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्य आहे. या संस्था महाराष्ट्राचे भूषण आहेत. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक संवेदनशीलता रुजवण्याचे काम विद्यार्थी साहाय्यक समिती करते आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. महाराष्ट्रातील लोकांमध्ये दानत आहे. चांगल्या कामासाठी लोक सढळ हाताने मदत करतात. आपले काम तेवढ्या तळमळीने आणि प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचायला हवे.”
प्रदीप मांडके यांनी प्रास्ताविकात सांगितले की, मुलांमध्ये संकलनाचा संस्कार रुजावा, त्यांच्यामध्ये सामाजिक कार्याची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम असतो. प्रत्येकाने किमान वीस लोकांना भेटून प्रत्येकी शंभर रुपये संकलित करावे, असा उद्देश असतो. त्यातून त्यांच्यामध्ये आपल्या संस्थेप्रती आदराची भावना तयार होते, असेही त्यांनी नमूद केले.
सहाय्य संकलनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पर्यवेक्षकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी निधी संकलन करताना आलेले अनुभव मांडले. कार्यकर्ते वल्लभ कोल्हटकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. समितीचे विश्वस्त, सल्लागार, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
