पहिला ‘महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार २०२५’ प्रदान
पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन व महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
पुणे, दि. २१- मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागात काम करताना अनेक आव्हाने येतात. मात्र, त्यावर उपायोजना करून तेथील बालक, माता व अन्य रुग्णांना उपचार देण्यासाठी आम्ही दोघे योगदान देत आहोत. तरुणांनी पुढे येऊन ग्रामीण भागातल्या आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्याचे काम करावे. प्रगत आरोग्य सुविधा दुर्गम भागात पोहोचवण्यासाठी समाजाच्या व शासनाच्या स्तरावर प्रयत्न व्हावेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे (Senior social activist Padma Shri Dr. Ravindra Kolhe ) यांनी केले.
रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष (मुंबई), अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालगंधर्व परिवार ट्रस्ट, पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र साहित्य परिषद, ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी झाले. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात डॉ. स्मिता व डॉ. रवींद्र कोल्हे यांना पहिला ‘महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार २०२५’ प्रदान (Dr. Smita and Dr. Ravindra Kolhe awarded the first ‘Maharashtra Arogya Bhushan Award 2025’) करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. कोल्हे बोलत होते. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाखाचा धनादेश रामेश्वर नाईक यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
प्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. संजय ओक, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, ज्येष्ठ पत्रकार संतोष आंधळे, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डाॅ. अविनाश भोंडवे, माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी चंद्रशेखर दैठणकर, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, स्वागताध्यक्ष व रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मेघराज राजेभोसले, डॉ. मिलिंद भोई, माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे, मिलिंद गायकवाड, अपर्णा साठे आदी उपस्थित होते.
(Dr. Ravindra kolhe said)डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले, “प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करतानाही हजारो बालमृत्यू व मातामृत्यू वाचवण्यात यश आले. या कार्याला आणखी व्यापक करण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार आहे. मैलोनमैल डॉक्टरांचा अधिवास नसणाऱ्या भागात कुपोषण मुक्तीसाठी लढा दिला. संशोधन केले. त्यावर उच्च न्यायालयाने शासनाला ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आपले संशोधन समाजाच्या हितासाठी उपयोगाला आल्याची भावना आहे. सध्या या भागातील कुपोषणाचे प्रमाण घटले असून, आरोग्यसुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत.”
रामेश्वर नाईक म्हणाले, “राज्यातील गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची स्थापना केली. गेल्या १० वर्षांत रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हा विभाग काम करत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना, जवळची रुग्णालये, तेथील उपचारांची माहिती एकाच ठिकाणाहून मिळावी, यासाठी लवकरच वॉर रूम उभारण्यात येणार आहे. प्रत्येक गरजू रुग्णाला आरोग्यसुविधेचा लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.”
प्रास्ताविकात उमेश चव्हाण म्हणाले, “पाठ्यपुस्तकात आरोग्यावर आधारित एकही पुस्तक नाही, याचे शल्य आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणारे अनेक लोक चांगल्या साहित्याची निर्मिती करत आहे. हे साहित्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी महत्वाचे आहे. असे साहित्य सर्वांसमोर यावे, यासाठी हे संमेलन महत्वाचे आहे. आरोग्य व्यवस्था सुधारत आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, विविध शासकीय योजनांमुळे पैशांअभावी उपचार थांबले जात नाहीत. याचा लेखाजोखा मांडण्यासाठी साहित्याची निर्मिती व्हावी.”
डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, “डॉक्टर आणि रूग्ण यांचे नाते विळ्या-भोपळ्याचे आहे. त्यांच्यामध्ये सुसंवाद वाढण्याची गरज आहे. डॉक्टरांची अनेक संमेलने झाली. मात्र, रूग्ण आणि डॉक्टर यांना एकत्र आणणारे हे संमेलन आहे. विकसित आरोग्यसुविधा, शासकीय योजना याची माहिती लोकांपर्यंत सोप्या भाषेत जाण्यासाठी अशी संमेलने उपयुक्त ठरतात. राज्यभर अशा संमेलनांचे आयोजन व्हावे.”
शारिरीक अवस्थेबरोबरच मनाची स्थिती सुधारण्यासाठी साहित्य क्षेत्रात अनेक डॉक्टर कार्यरत असतात. त्यांच्या साहित्याचा मेळा यानिमित्ताने भरला आहे, असे चंद्रशेखर दैठणकर यांनी नमूद केले. अमोल देवळेकर यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद गायकवाड यांनी आभार मानले.
डॉक्टर सर्जनशील लेखक
अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय ओक म्हणाले, “सर्जनशील डॉक्टरांमध्ये एक चांगला लेखक दडलेला असतो. आजवर वैद्यकीय साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याला चांगले व्यासपीठ देण्यासाठी अशा स्वरूपाची संमेलने उपयुक्त ठरतात. आरोग्य व्यवस्था प्रगत झाली, मात्र ती गोरगरिबांपर्यंत पोहोचली नाही. डॉक्टर व रुग्णांमधील संवाद तुटल्याचे आपल्याला दिसते. हा संवाद पुन्हा सांधायचा असेल, तर वैद्यकीय महाविद्यालयांत मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना, ग्रंथालयाची निर्मिती, विविध स्पर्धांचे आयोजन, वैद्यकीय परिषदांमध्ये मराठीत संवाद होण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत. खासगी व सरकारी रुग्णालयांतील दारी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”
महाआरोग्य तपासणी शिबीर
संमेलनाच्या निमित्ताने पुणे आरोग्य महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये हजारो रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पुण्यातील नामांकित हॉस्पिटल व त्यातील तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनात पुणेकर नागरिक, कलाकार, साहित्यिक, पत्रकार यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. विविध तपासण्या, दिव्यांसाठी साहित्य, औषधांचे वाटप, मोबाईल वैद्यकीय सेवा वाहन या महोत्सवात होते.