चला तंबाखू सोडूया, पर्यावरण वाचवूया!
पुणे : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात. कर्करोगासारखे भयंकर रोग माणसाला जडतात. त्याचबरोबर पर्यावरणाची मोठी हानी होते. ही बाब लक्षात घेऊन सर्वांनी ‘तंबाखू सोडूया, पर्यावरण वाचवूया!’ असा संकल्प करण्याचे आवाहन जागतिक तंबाखू निषेध दिनी शाकाहार व व्यसनमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले. टप्प्याटप्प्याने तंबाखूच्या शेतीवर बंदी आणण्याची मागणीही त्यांनी केली.
दरवर्षी जगभर ३१ मे रोजी जागतिक तंबाखू निषेध दिन साजरा होतो. तंबाखूच्या परिणामांबाबत जागृती केली जाते. डॉ. गंगवाल गेली चार दशकाहून अधिक काळ व्यसनमुक्तीच्या प्रसारासाठी समर्पित भावनेने कार्यरत आहेत. यंदा ‘चला तंबाखू सोडूया, पर्यावरण वाचवूया’ हा संदेश देत मानवी आरोग्य, सामाजिक समतोल आणि पर्यावरण संरक्षण यावर डॉ. गंगवाल जागृती करत आहेत. याविषयी जनजागृती करण्यासाठी समाजातील जनसामान्यांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले आहे.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “संपूर्ण जगात तंबाखूमुळे मरणाऱ्यांची संख्या ८० लाखाहून अधिक आहे. यामुळे २० प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. गळ्याच्या आणि तोंडाच्या कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. शिवाय विविध कारणांसाठी संपूर्ण पर्यावरणात ८४ मेगाटन कार्बन डायऑक्साईड दरवर्षी उत्सर्जित होतो. सिगारेट बनविण्यासाठी लाखोंनी वृक्षतोड होते. सहा ट्रिलियन सिगारेटसाठी साधारणपणे ६०० कोटी झाडांचा बळी द्यावा लागतो. याशिवाय करोडो लिटर पाणी व दोन लाख हेक्टर जमिनीची गरज लागते. एकंदरीत तंबाखूसेवन हे संपूर्ण पृथ्वीच्या स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे. गुटख्याच्या उत्पादनासाठी लागणारा कात मिळवण्यासाठी लाखोंनी खेर झाडे तोडली जात आहेत. हे थांबायला हवे. सर्वोच्च न्यायालयाने या खेर झाडांची तोड करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपण सामान्यांनी या खेर झाडाचे रक्षण केले पाहिजे.”
या दिवसानिमित्त संपूर्ण देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत जनसामान्यांनी देखील या उपक्रमात पुढे येऊन प्रबोधन करणे आवश्यक आहे. शिवाय शासनस्तरावर देखील यासंदर्भात ठोस पाऊले उचलत कडक निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे डॉ. कल्याण गंगवाल यांनी सांगितले.