प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची मागणी; पीडित महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ अभियान

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची मागणी; पीडित महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ अभियान

पुणे: “सायली सुर्वे हिची सुखरूप घरवापसी करण्यात यश आले असून, ती सुरक्षित घरी पोहोचली आहे. मात्र, सध्या ती प्रचंड तणावाखाली असून, तिचा आतोनात छळ झाला आहे. अटकपूर्व जामिनासाठी नाहरकत पत्र घेण्यासाठी सायलीला जबरदस्तीने नेण्यात आले होते. तेथे तिच्यावर मानसिक व शारीरिक दबाव टाकण्यात आला. सायलीचे शोषण करणाऱ्या पती आतिफ व सासू गुलशन तासे यांना तातडीने अटक करावी,” अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली. लव्ह जिहादसारख्या घटनांनी पीडित महिलांच्या साहाय्यासाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ अभियान सुरु करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “सायलीला जबरदस्तीने सोबत नेणाऱ्या आतिफ तासे याच्यावर २८ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, तो पोलीस नोंदीमध्ये फरार असल्याचे समोर आले आहे. सायलीने यापूर्वी अनेकवेळा त्याच्याविरोधात तक्रारी दिल्या होत्या. तरीही तिला पोलीस संरक्षण का देण्यात आले नाही. तिच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची होती, याचीही चौकशी व्हायला हवी. सायलीवर सातत्याने दबाव टाकण्यात आल्याने तिची मानसिक अवस्था अत्यंत बिकट झाली होती. तिला पुन्हा जबरदस्तीने घेऊन जाण्यात आले. आतिफ तासे व त्याच्या कुटुंबीयांकडून सायलीचा छळ करण्यात येत आहे. तिच्या आई-वडिलांना, तसेच मामा व इतर नातेवाईकांना धमकवले जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून आरोपीना अटक करायला हवी.
 
सायलीला घटस्फोट हवा असून, तिला साधेपणाने आयुष्य जगायचे आहे. आपल्या मुलांना वाढवायचे आहे. त्यामुळे तिला घटस्फोट मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली. स्थानिक पोलिसांच्या त्रुटींबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून सायलीचे सुखरूप सुटका करण्यासाठी यंत्रणांना सूचना दिल्या. त्याबद्दल कुलकर्णी यांनी फडणवीसांचे आभार मानले. सायलीसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत, तिला घाबरण्याचे कारण नाही, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच, अशा घटनांतील मुलींना तात्काळ पोलीस मदत मिळावी, हीच अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले. तिच्यावर मोठे मानसिक दडपण असून, चार मुलांना आणि तिच्या आईवडिलांना देखील धोका आहे. ज्यावेळी महिला पोलिसांकडे तक्रार करतील त्यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. सासू गुलशन हिच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, तिच्या चार सुना हिंदू आहे. त्यातील काहीजणांनी सासू विरोधात तक्रार देखील दिली आहे. हा लव्ह जिहाद प्रकार आहे. पोलीस ठाण्यात भरोसा सेल प्रमाणे स्वतंत्र लव्ह जिहाद सेल निर्माण केला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला की, बळजबरीने धर्म बदल करण्यासाठी कोणावरही दबाव टाकला जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ नावाचा विशेष सेल सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असून, राज्यातील गरजू महिलांना समुपदेशनासह सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.समुपदेशन आणि पुनर्वसन तसेच पीडित मुलींना मदत या अभियान मधून केली जाणार आहे.