पुणे, दि. ६ – शाकाहार प्रणेते व सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांना ‘समाज शिरोमणी’ पुरस्काराने सन्मानित (Dr. Kalyan Gangwal honored with ‘Samaj Shiromani’ award) करण्यात आले. नवचैतन्य सामाजिक संस्था चिखली व श्री वर्धमान जैन स्थानकवासी श्रावक संघ दापोडी यांच्या वतीने डॉ. गंगवाल यांच्या ५० वर्षांच्या निःस्वार्थ कार्याचा सन्मान करण्यात आला. धर्मप्रभावाक, वाणीभूषण प. पू. श्री प्रशांत ऋषीजी म. सा. यांच्या सानिध्यात डॉ. गंगवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. गंगवाल यांनी सदाचार, शाकाहार, जीवदया, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्तीसाठी गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ केलेल्या सेवाकार्याबद्दल, तसेच ४० लाख लोकांना शाकाहारी बनवल्याबद्दल त्यांचा गौरव समाजाच्या वतीने करण्यात आला. समाजातील विविध घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. डॉ. अशोककुमार पगारिया, दिलीप भन्साली, सुवालाल जैन, नितीन वेदमुथा, सुरेश गादिया, सतीश लुंकड अनिता नहार, सुनीता बोरा, कविता भळगट, संजय छाजेड, पी. एम. जैन, सुनील मुनोत आदी उपस्थित होते.
हा केवळ व्यक्तिगत सन्मान नाही, तर डॉ. कल्याण गंगवाल यांनी समर्पित भावनेने गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ केलेल्या कार्याचा हा गौरव आहे, अशा शब्दांत प. पू, श्री. प्रशांत ऋषीजी यांनी शुभाशीर्वाद दिले. आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित झालो आहे, मात्र, आज समाजाच्या वतीने मिळालेला हा पुरस्कार आपुलकीच्या, प्रेमभावाच्या शुभेच्छा आहेत, अशी भावना डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केली.