‘गोंधळ एक कुलाचार’ पुस्तकाचे प्रकाशन व विद्यार्थ्यांचा गुणगौरव
पुणे, दि. १७ – “भारतीय संस्कृती, परंपरा प्राचीन आहे. लोककला, लोकसाहित्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असताना अधिक समृद्ध होते. संस्कृती, समाजाचे स्वास्थ्य टिकवण्याचे काम लोककलावंत करत असतात. त्यामुळे जागतिक स्तरावरील ज्ञान घेतानाच आपल्या संस्कृती, परंपरेला जपायला हवे,” असे प्रतिपादन लोककलेचे अभ्यासक व आळंदी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे (Folklore scholar and trustee of Alandi Devasthan Trust Dr. Bhavarth Dekhne ) यांनी केले
गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघातर्फे हरीश पाचंगे लिखित, वेदांतश्री प्रकाशन प्रकाशित ‘गोंधळ एक कुलाचार’ या पुस्तकाचे प्रकाशन, (Vedantashri Prakashan publishes the book ‘Gondhal Ek Kulachar’ )पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. व्यंकप्पा सुगतेकर यांचा सत्कार व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश प्रभुणे, लोककलेचे अभ्यासक डॉ. भावार्थजी देखणे, पद्मश्री दादासाहेब इदाते, अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास केंद्राचे संचालक सतीश मोटे, प्रकाशक सुनील उंब्रजकर, संघाचे अध्यक्ष परेश गरुड, उद्योजक धर्मनाथ गायकवाड, मयूर शेळके आदी उपस्थित होते.
(Dr. Bhavarth dekhne said)डॉ. भावार्थ देखणे म्हणाले, “आजही महाराष्ट्राच्या गावागावांत कीर्तन, प्रवचने होतात. वारकरी संप्रदायाला हजार वर्षांची परंपरा आहे. विविध लोककलांचे सादरीकरण होते. या परंपरा कायम ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. रुढी आणि परंपरा यातील फरक समजून घ्यावा. आपला समाज अनुकरणप्रिय असल्याने अयोग्य गोष्टींना थारा देऊ नये. निरामय पद्धतीने हे काम पुढे घेऊन जायला हवे. समाजाचे जीवन उन्नत करण्याचे काम लोककलावंतांनी यापुढेही अविरतपणे सुरु ठेवावे. गोंधळी हे खऱ्या लोकधर्माचे पुरोहित आहेत.”
(Dr. Girish prabhune said)डॉ. गिरीश प्रभुणे म्हणाले, “लोककलावंत समाजाचे प्रबोधन करीत असतात. त्यांच्या कलाद्वारे लोकमानसावर थेट परिणाम घडतो आणि समाजातील अंधश्रद्धा, कुप्रथा व अन्यायकारक गोष्टींविरुद्ध जागृती निर्माण होते. लोककलेतून समाजपरिवर्तन घडविण्याची ताकद असते. ग्रामीण भागातील संस्कृती, परंपरा आणि सामाजिक समस्यांचे प्रतिबिंब लोककलांमध्ये दिसते. त्यामुळे समाजातील बदलत्या परिस्थितीनुसार लोककला जिवंत ठेवणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे.”
डॉ. व्यंकप्पा सुगतेकर यांनी नागरी सत्काराने भारावून गेलो असल्याचे सांगितले. कानडी भाषेतून सादर केलेल्या भावपूर्ण गोंधळी गीताने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सतीश मोटे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या संबळ वादन, गणेशवंदना, देवीची प्रार्थनेने सभागृहात भाव-भक्तिमय वातावरण तयार झाले.
परेश गरुड यांनी स्वागत प्रास्ताविक केले. मुकुंद यमगळ यांनी सूत्रसंचालन केले. चंदन अटक यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरीष खडके, पवन अटक, रमेश उबाळे, हरीश पाचंगे, चंदन अटक, उत्तमराव वाघमोडे, बलराज काटे, ज्ञानेश्वर बडगे, ऍड. मुकुंद यदमळ, प्रसाद पवार, किशोर ढेंबे, अशोक वराडे, प्रमोद काटे, रवी ननावरे यांनी परिश्रम घेतले.
