बंधुभावाचा विचार समाजाला एकसंध, समृद्ध करणारा : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत’ पुरस्कार वितरण

बंधुभावाचा विचार समाजाला एकसंध, समृद्ध करणारा : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत’ पुरस्कार वितरण

बंधुभावाचा विचार समाजाला एकसंध, समृद्ध करणारा
बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचे मत; आथरे, राठोड यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत’ पुरस्कार प्रदान

पुणे : “विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, बंधुतेची भावना जोपासत समाज घडवण्याचे काम शिक्षक करतो. आधुनिक शिक्षणासोबत माणुसकी, नैतिक मूल्यांचे शिक्षण ही काळाची गरज आहे. ‘माणूस’पणाची जाणीव करून देणारी, बंधुभावाचा विचार पेरणारी संमेलने समाजाला एकसंध, समृद्ध करणारी आहेत,” असे मत विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी व्यक्त केले.

विश्वबंधुता साहित्य परिषद आणि भारतीय जैन संघटनेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या विश्वबंधुता विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी रोकडे बोलत होते. कादंबरीकार प्रा. शंकर आथरे व विलास राठोड यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
 
प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, संमेलनाध्यक्षा डॉ. सविता पाटील, प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, स्वागताध्यक्ष सुरेश साळुंके आदी उपस्थित होते. ‘बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुतेच्या मुल्याकडे समाजात दुर्लक्ष होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला, विचारांना चांगले वळण लावण्याचे काम शिक्षकांचे असते. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी क्रांतिकारी विचारवंतांकडून प्रेरणा घेऊन जीवनात प्रामाणिक काम करत राहावे. बंधुतेचा धागा जपत माणसे जोडण्याचे काम करावे.”
डॉ. सविता पाटील म्हणाल्या, “बंधुतेच्या विचारयात्रेमध्ये सर्वानी सहभागी व्हायला हवे. बंधुतेच्या सानिध्यात येणारी प्रत्येक व्यक्ती अहंकार विसरून मानवतेला स्वीकारताना दिसते, ही अत्यंत सुखद बाब आहे.”
डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “बंधुतेचा विचार प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे. साहित्याच्या माध्यमातून बंधुतेचा प्रसार प्रभावीपणे झाला, तर विश्वात बंधुभावाचे, प्रेमाचे वातावरण तयार होईल.”
 
शंकर आथरे व विलास राठोड यांनीही सत्काराला उत्तर दिले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजय गायकवाड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *